गणेशोत्सव सवलत धमाका! संगणक, मोबाइलसह वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:03 PM2024-09-06T13:03:48+5:302024-09-06T13:04:29+5:30
Ganeshotsav discounts : गणेशोत्सवादरम्यान अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी ३० टक्क्यांपर्यंत सूट योजना जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांना संगणक, मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट या वस्तू स्वस्तात मिळणार आहेत.
मुंबई - गणेशोत्सवादरम्यान अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी ३० टक्क्यांपर्यंत सूट योजना जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांना संगणक, मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट या वस्तू स्वस्तात मिळणार आहेत.
दरवर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मात्या कंपन्या स्टॉक क्लिअर करण्यासाठी सूट जाहीर करतात. हा स्टॉक क्लिअर झाल्यानंतर दिवाळीत नवी मॉडेल्स सादर करून खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित केले जाते. यापूर्वी गणेशोत्सवात १५ ते २५ टक्के सूट जाहीर केली जात होती. यंदा मात्र त्यात वाढ करत काही उत्पादनांवर ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मासिक हप्त्यांवर खरेदी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी सुलभरीत्या करता यावी, यासाठी अनेक कंपन्यांनी वित्तीय पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी करार करून मासिक हप्त्यांवर तत्काळ वस्तू खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर काही प्रमुख इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी क्रेडिट कार्ड कंपन्यांशीही करार केला आहे. याद्वारे सूट, मासिक हप्ता आदी सुविधा तर मिळेलच; पण त्याचबरोबर क्रेडिट कार्ड कंपन्या स्वत:हून काही सूट देऊ शकतात.
जुन्या उत्पादनांवर बोनस
जुन्या उत्पादनांवर विशेषतः मोबाइल फोनसाठी विशेष लॉयल्टी बोनस देत किंमत आणखी कमी करण्याची योजनाही कंपन्यांनी केली आहे. एकीकडे ऑफलाइन खरेदीद्वारे कंपन्यांना मोठ्या विक्रीची अपेक्षा असताना दुसरीकडे ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातूनही भरघोस सूट योजना जाहीर केल्या जाणार आहेत.
अब्जावधींचे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या कंपन्यांनी मूळ कंपनीने दिलेल्या सूट योजनेसोबत स्वतःची आणखी विशिष्ट सूट देत विक्रीचा जोर वाढवण्यावर भर दिला आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवात ग्राहकांना आपल्या आवडीचे उत्पादन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
कंपन्यांचे डावपेच
सणासुदीच्या हंगामात इलेक्ट्रॉनिक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती जाहीर करतात. गणेशोत्सवात प्रामुख्याने वर्षभरातील शिल्लक वस्तूंची विक्री केली जाते, तर दिवाळीत नव्या वस्तू बाजारात दाखल केल्या जातात. त्यासाठी आकर्षक सवलतींचा वर्षाव केला जातो. अर्थसाह्याची व्यवस्था करून खरेदी सुलभ करण्याचे डावपेच कंपन्या आखतात.