Join us

हुल्लडबाजांमुळे गणेशोत्सवाला गालबोट, करी रोड येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 2:11 AM

गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारी हुल्लडबाजी शनिवारी पुन्हा एकदा मुंबईत दिसून आली.

मुंबई : गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणारी हुल्लडबाजी शनिवारी पुन्हा एकदा मुंबईत दिसून आली. करी रोड आणि परळमधील आगमन सोहळ्यांदरम्यान चार चारचाकी वाहनांच्या टपावर चढून काही हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी तैनात पोलिसांना मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या जमावावर नियंत्रण ठेवताना, हा लज्जास्पद प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या या आगमन सोहळ्यादरम्यान हा प्रकार घडला. दरवर्षी चिंतामणीच्या आगमनावेळी मोठ्या संख्येने भाविक व बघ्यांची गर्दी होते. या गर्दीचे नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस आणि कार्यकर्ते करत होते. मात्र, काही अतिउत्साही बघ्यांनी याच संधीचा फायदा घेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कोंडीत सापडलेल्या गाड्यांवर चढत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, बांधकामात वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मिक्सरवर चढून हा ओंगळवाणा प्रकार सुरू होता. बहुतेक भाविकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. याउलट पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्तेही गर्दीच्या नियोजनात व्यस्त असल्याने हुल्लडबाजांचे फावले.या संदर्भात चिंचपोकळीचा चिंतामणीचे प्रसिद्धीप्रमुख संदीप परब म्हणाले की, अशा हुल्लडबाजांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे. मुळात या हुल्लडबाजांचा उत्सावाशी काहीही संबंध नसतो. याउलट उत्सवाला गालबोट लावण्याचे काम ते करत असतात. चिंतामणीच्या आगमनासाठी लोटलेल्या महापुरामुळे कार्यकर्ते नियोजनात व्यस्त होते. मात्र, यापुढील सोहळ्यांतही अशा हुल्लडबाजांकडून बदमाशी होण्याची शक्यता आहे. तरी मंडळ उत्सव कालावधीत अशा हुल्लडबाजांसह मोबाइल आणि पैसे चोरणाºया टोळ्यांबाबत भाविकांना सूचित करत असते.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव