गणेशोत्सवाच्या सुट्ट्या पालक शिक्षक संघ ठरवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:08 AM2021-09-10T04:08:58+5:302021-09-10T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात शाळांना ७ दिवसांची सुट्टी देण्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात शाळांना ७ दिवसांची सुट्टी देण्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, असे शिक्षण निरीक्षक कार्यालयाने नवीन आदेश या उत्सवाला सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर काढले आहेत. या कालावधीत नेमक्या किती सुट्ट्या मिळतील याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध संघटनांनी निवेदन देऊन कमीत कमी ५ दिवसांच्या सुट्ट्यांची मागणी केल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय आता हा सुट्ट्यांचा चेंडू पालक शिक्षक संघाच्या कोर्टात ढकलला आहे. सोबतच वर्षभरातील ७६ शैक्षणिक सुट्ट्यांचे नियोजन करण्याच्या ही सूचना केल्याने शिक्षक व शाळा व्यवस्थापनच संभ्रमित झाले आहेत.
अनेक विद्यार्थी पालक गणेशोत्सव दरम्यान गावी जात असल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिवाय बारावीच्या फेरपरीक्षा लक्षात घेऊन गणेशोत्सवाची ७ दिवस सुट्टी दिली जावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. दरम्यान गणेशोत्सव सणानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किमान ७ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ व शासनाचे प्रचलित आदेश, नियम, मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल याप्रमाणे नियोजन केले जावे असे निर्देश शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या अटीचे अधीन राहून शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर करण्यात यावी. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. मात्र हे आदेश गणेशोत्सवाच्या केवळ एक दिवस आगोदर आल्याने शाळा, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याची शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक शिक्षकांनी याला विरोध केला असून अनेक इतर व्यवस्थापन आणि माध्यमाच्या शाळा या सुट्ट्यांना विरोध करतील, अशी शंका पालक, शिक्षक व्यक्त करत आहेत. गणेशोत्सवाच्या सुट्टीचा निर्णय शिक्षण विभंगणारे न घेता शिक्षक पालक संघावर सोपविल्याने शाळानिहाय गणेशोत्सव सुट्टीत अंतर राहणार असून बहुतांश शाळाकडून सुट्ट्या नाकारल्या गेल्याने पालक विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचा आनंद मिळणार नसल्याचे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केले.