गणेशोत्सव मंडळांची तयारी आली अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:02 AM2020-08-19T02:02:03+5:302020-08-19T02:02:16+5:30

यंदा देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य मंडप, रोषणाई व जाहिरातबाजी केली नाही.

Ganeshotsav Mandals are in the final stage of preparation | गणेशोत्सव मंडळांची तयारी आली अंतिम टप्प्यात

गणेशोत्सव मंडळांची तयारी आली अंतिम टप्प्यात

Next

ओमकार गावंड 
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य मंडप, रोषणाई व जाहिरातबाजी केली नाही.
छोटा मंडप, छोटी मूर्ती व उत्सवात कमी गर्दी यामुळे उत्सवाच्या तयारीसाठी खर्च व वेळही कमी लागत आहे. यंदा गणेशोत्सव मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी लागणारे नियोजन, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, प्लाज्मादान अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा मुंबईतील महत्त्वाच्या मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी आपले आगमन सोहळे आणि विसर्जन सोहळेही रद्द केले आहेत. आपल्या परिसरातच कृत्रिम तलाव निर्माण करून त्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची तयारी सर्व मंडळांनी सुरू केली आहे. कोरोनामुळे अनेक लोकांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे मंडळांनी वर्गणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
>गणेशोत्सवाची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. रस्त्यावर मंडप उभा करून नागरिकांना अडथळा न व्हावा यासाठी मंडळाचा गणपती दरवर्षी हॉलमध्ये बसवला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही इकोफ्रेंडली मूर्ती असणार आहे. मंडळ दरवर्षी आपल्या देखाव्यातून समाज प्रबोधनात्मक विषय मांडत असते. मुंबई महानगरपालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धांमध्येही मंडळ दरवर्षी भाग घेते व पारितोषिक पटकावते. अवयवदान, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या, साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना अशा प्रकारचे विविध विषय घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही विषय लोकांपर्यंत घेऊन जात नसलो तरीही विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. मूर्तीचे विसर्जनही परिसरातील कृत्रिम तलावात करण्याचे नियोजन आहे. यावेळी भाविकांकडून वर्गणीही घेतली नाही व जास्त लोक एकत्र येतील असे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
- प्रमोद खाडे, सेक्रेटरी, श्रीहनुमान सेवा मंडळ, धारावी
>कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा गणपती दीड दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप यंदा भव्य नसल्यामुळे आम्ही दहा बाय वीस फुटांचा मंडप आणि त्यात तीन फुटांची गणेशमूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडपाच्या बाजूलाच कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येत आहे व त्यातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
- श्रीकांत जाधव, अध्यक्ष, शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवडी

Web Title: Ganeshotsav Mandals are in the final stage of preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.