Join us

गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मंडळांच्या मागणीनुसार तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मंडळांच्या मागणीनुसार तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत असून या तात्पुरत्या जोडणीच्या वीज वापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सवात पावसाची शक्यता असल्याने मंडळांनी धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीज यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेश मंडळांनी बेकायदा विजेचा वापर केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो. त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीज यंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या वायर खाली झुकलेल्या नाहीत, विस्कळीत झालेल्या नाहीत याची रोज तपासणी करावी.

मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायरमधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायरचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.