गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालवाद्यांची दुकाने ‘हाउसफुल्ल’, ढोलकीला सर्वाधिक मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:34 AM2018-09-03T04:34:22+5:302018-09-03T04:35:15+5:30
गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी करण्यावर भर दिला आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे लालबागच्या मार्केटमध्ये तालवाद्यांच्या दुकानात मोठी वर्दळ दिसून येत आहे. ढोलकी, मृदंग, तबला, डग्गा, पखवाज या वाद्यांची आवक वाढली आहे. मुंबईतल्या तालवाद्यांना कोकणात चांगली मागणी असल्यामुळे, शहरातील लोक कोकणात तालवाद्ये नेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत.
तालवाद्यांच्या दुकानांत ढोलकीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. गणपतीच्या आरतीसाठी ढोलकी हे वाद्य प्रामुख्याने लागते. त्यामुळे ढोलकीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालवाद्यांच्या चामड्याची गॅरंटी दिली जात नाही, परंतु वाद्याचे खोड किंवा इतर भाग नादुरुस्त झाल्यास, त्यावर स्वत: प्रयोग न करता थेट कारागिरांकडे घेऊन येण्याचा असा सल्ला दुकानदारांनी दिला.
तालवाद्यांचे दर असे...
ढोलकी तीन ते साडेतीन हजार, तबला आणि डग्गा पाच ते साडेपाच हजार, मृदुंग सहा ते साडेसात हजार, कांस्याचे (काशाचे) टाळ ५०० ते ८०० रुपये आणि पितळीचे टाळ ४०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
तालवाद्यांसाठी लागणारे चामडे सोलापूरमधून मागविले जाते, तसेच ढोलकी, मृदंग, तबला आणि डग्गा इत्यादी वाद्यांसाठी लागणारी शाई गुजरातमधील भावनगर येथून मागविली जाते, अशी माहिती तालवाद्यांचे कारागीर सुरेश चौहान यांनी दिली.
तालवाद्य
शिकण्याची ओढ
गणेशोत्सव सणाच्या आधी एक महिना काहींना संगीत शिकण्याची आवड निर्माण होते. यातील काही जण गणपतीची आरती वाजविता यावी, यासाठी शिकतात. तर काही जण सर्व प्रकारचे ताल वाजता यावेत, यासाठीही शिकायला येतात. सध्या भारतीय संगीत प्रचार केंद्रामध्ये १५० विद्यार्थी संगीताचे शिक्षण घेत आहेत. आमच्या इथे ९ प्रकारची तालवाद्ये शिकविली जातात.
- हनमंत परब, संगीत शिक्षक, भारतीय संगीत प्रचार केंद्र.