Join us

गणेशोत्सवात रंगला राजकीय फड; पोस्टरमधून उधळली स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:36 PM

मुंबई महापालिकेसह येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा राजकीय फड गणेशोत्सवातील पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जमधून रंगू लागला आहे.

मुंबई :

मुंबई महापालिकेसह येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा राजकीय फड गणेशोत्सवातील पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जमधून रंगू लागला आहे. मुंबापुरीतले हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पोस्टर्स वगळले तर बहुतांश पोस्टर्सवर ठाकरे आणि शिंदे गटासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्यात आली असून, त्यातील बहुतांश पोस्टर ही ठाकरे आणि शिंदे गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे महापालिकेचे रणशिंग गणेशोत्सवातल्या पोस्टर वॉरमधून फुंकले गेले असून, नवरात्रोत्सव आणि दिवाळीदरम्यान यात आणखी भर पडणार आहे.

दहीहंडीदरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरमधूनच याचा टिझर दिसून आला असतानाच गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या कमानींवर राजकीय पक्षांची छाप दिसून आली. गणेशोत्सव बहरत गेला तसतसे पोस्टर्सची संख्या मंडळाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यांपर्यंत वाढत गेली. दक्षिण मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, सांताक्रुझ स्टेशन रोड, मालाड स्टेशन रोडसह बहुतांश स्टेशन रोडवर लावलेले पोस्टर हे राजकीय पक्षांशी निगडित आहे.

बिल्डर आणि उद्योगपतीलालबाग आणि परळ परिसरात लावलेल्या पोस्टर्सवर उद्योगपतींचा प्रभाव असून, नामांकित उद्योगपतींसह अनेक पोस्टर्सवर बिल्डरांची छाप आहे.

विसर्जन स्थळ की पोस्टर्सचा अड्डा लालबहादूर शास्त्री मार्गावर शीतल तलावाचा परिसर तर पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिग्जने भरून गेला आहे.एलबीएसच्या प्रत्येक खांबावर दिलीप लांडे यांचे पोस्टर्स लागले आहेत. ही स्थिती केवळ कुर्ल्यात नाही तर प्रत्येक विसर्जनस्थळावर राजकीय पक्षाने जागा व्यापल्या आहेत.

 कोल्ड वॉर   पूर्व उपनगरात कुर्ला, कलिना, घाटकोपर, चांदिवलीसह जवळच्या परिसरात काँग्रेस, शिंदे गट आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर रंगले आहे.  शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या दोन्ही मुलांचे फोटो असलेली कमान सुंदरबागच्या प्रवेशद्वारावर लागली आहे. भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनीही नेहमीप्रमाणे गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे पोस्टर एलबीएस मार्गावर लावले आहेत. काँग्रेसचे चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान यांनीही गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे पोस्टर्स, कमानी सिग्नलवर लावल्या आहेत.

ठाकरे गटाची छापलालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी, वरळी, लोअर परळ या परिसरांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर आमदार आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून, अनेक पोस्टर्सवर ठाकरे गटाची छाप दिसत आहे.

महापालिका काय करणार   मुंबई विद्रुप करणाऱ्या बॅनर्स, पोस्टर्ससह होर्डिंग्जवर पालिकेकडून कारवाई अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र आता गणेशोत्सवाचे ८ दिवस उलटून गेले, तरी मुंबईचा प्रत्येक काेनाकोपरा पोस्टर्सने भरून गेला आहे.

टॅग्स :मुंबई