लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेले दीड वर्षे कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारे प्रवासी वाढल्यामुळे भाडेवाढ करीत व्यावसायिकांनी तोट्यातून सावरण्याची संधी साधली आहे.
कोरोनाकाळात नागरिकांच्या मुक्त संचारावर निर्बंध आल्याने ट्रॅव्हल्सचा व्यवसाय थंडावला. मधल्याकाळात लग्नसराईने जोर धरल्यानंतर थोडीफार आशा निर्माण झाली होती. दुसऱ्या लाटेने निराश केले. गेले दीड वर्ष हीच स्थिती कायम असल्यामुळे व्यवसायात प्रचंड तोटा झाला. गणेशोत्सवाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
निर्बंधांमुळे गेल्यावर्षी गणेशोत्सवात गावी जाता न आल्याने निराश झालेले चाकरमानी यंदा मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सरकारी प्रवासी साधने अपुरी असल्याने ट्रॅव्हल्सनी ही संधी साधत भाडेवाढ केली. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली असली तरी व्यावसायिक मात्र सुखावले आहेत.
......
या मार्गावर सर्वाधिक टॅव्हल्स
मुंबई - गोवा
मुंबई - पुणे
मुंबई - नाशिक
मुंबई - कोल्हापूर
२) भाडे वाढले
आधीचे सध्या
मुंबई - गोवा ८०० १२००
मुंबई - पुणे ४०० ७००
मुंबई - सातारा ७०० १०००
मुंबई - कोल्हापूर ७०० १०००
......
दीड वर्षानंतर बरे दिवस
कोरोनामुळे दीड वर्षापासून व्यवसायात प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात व्यवसाय सुरू झाला आहे. तरीही बहुतांश खासगी बस उभ्या आहे. गणेशोत्सवामुळे बुकिंग वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
- मनोज राऊत, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
गेल्या दीड वर्षापासून प्रवासी नसल्याने गाड्या उभ्या आहेत. दुसरीकडे इंधनाचे दर वाढल्याने व्यावसायिक हैराण झाले आहेत. सणासुदीला थोडीफार भाडेवाढ केली तरी इतरवेळी प्रवासी जादा दर देण्यास तयार नसतात. त्यामुळे हा दिलासा तात्पुरता आहे.
- राकेश मोटे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
........
प्रवाशांना फटका
ऐरवी ५००-६०० रुपयांत ट्रॅव्हल्स मुंबई गोवा मार्गावर धावतात. तेव्हा यांना कसे काय परवडते? रेल्वे फुल्ल झाल्याचा फायदा घेऊन अवाजवी भाडेवाड केली जात आहे. परिवहनमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
-बाळा आडिवरेकर, चाकरमानी
गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे तिकीट मिळवणे मोठे दिव्य असते. त्यात यंदा रेल्वे फेऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे बहुतांश चाकरमान्यांना ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागले. त्याचा फायदा घेऊन बस मालकांनी भाडेवाढ केली. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
- सुरेश गवस, चाकरमानी