Join us

गणेशोत्सव विशेष रेल्वे आणि एसटी बस फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:09 AM

गणरायाचे आगमन १० सप्टेंबरला होणार आहे. मुंबई शहरातील काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने यंदा काेकणात गणेशाेत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची ...

गणरायाचे आगमन १० सप्टेंबरला होणार आहे. मुंबई शहरातील काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने यंदा काेकणात गणेशाेत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या माेठी आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे गणपती स्पेशल ट्रेनची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. एकीकडे रेल्वेगाड्या फुल होत आहेत तर दुसरीकडे एसटीचेही आरक्षण फुल झाले असून आणखी गाड्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनापूर्वी एसटीच्या १२ हजार गाड्या सोडण्यात येत होत्या तर प्रवासी ५ लाख होते आता २,३०० गाड्या असून प्रवासी संख्या १ लाख झाली आहे.

ते प्रवासी एसटी, रेल्वेकडे येतील

रत्नागिरी जिल्ह्यात एसटी आणि रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवाशांची त्यांच्या गावांमध्येच याद्या करून ज्यांचे दाेन डाेस किंवा काेराेना चाचणी झाली नसेल त्यांची गावातच काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. तर खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्याची चेकपाेस्टवर माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांनी आता एसटी आणि रेल्वेकडे धाव घेतली आहे. यामुळे एसटीच्या आणखी गाड्या आरक्षित हाेतील, असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोकणात जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन डोस आणि आरटीपीसीआरचा नियम शिथिल केला आहे, ही नक्कीच चांगली बाब आहे. सरकार गणेशभक्तांसाठी सोय करत आहे, पण प्रवाशांनीही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

संदीप परब, प्रवासी

ट्रॅव्हल्सला ५० ते ५५ टक्के प्रतिसाद

कोकणात आतापर्यंत ३५० गाड्या गेल्या असून ५० ते ५५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसात आणखी १,२०० ते १,५०० गाड्या जाण्याची शक्यता आहे.

हर्ष कोटक, सचिव, बस मालक संघटना