मुंबई : कोणताही सण असो, सण म्हटला की मिठाई ही आलीच. कारण मिठाईविना कोणताही सण साजरा होत नाही. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने भाविकही मोठ्या संख्येने बाप्पाच्या प्रसादाकरिता मिठाई खरेदी करतात. अगदी घरगुती गणपतीपासून ते गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने मिठाईचा नैवेद्य चढवितात. त्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे, तसेच ग्राहक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत असल्याने, मिठाई व्यापारीही आनंदात आहेत. मात्र, यंदा मिठाईने चांगलाच भाव खाल्ला असल्याने भाविकांच्या खिशाला कातर बसली आहे.
मागील वर्षी मुंबईत कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याने, मिठाईच्या दुकानांवर शुकशुकाट होता. अनेकांनी बाहेरचे पदार्थ खाणे टाळल्यामुळे गेल्या वर्षी मिठाई व्यापाऱ्यांना ५० टक्के नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, यंदा भाविक मोठ्या संख्येने मिठाई खरेदी करत असल्याने, मिठाई व्यापारीही आनंदात आहेत.
मिठाईचे दर वाढले
मागील काही महिन्यांमध्ये साखर, गूळ, खवा यांच्या दरांमध्ये वाढ झाली. सुक्या मेव्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचप्रमाणे, इंधनाचेही दर वाढले आहेत. यामुळे मिठाईचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. यामुळे यंदा मिठाईच्या किमतीत किलोमागे ५० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे.
अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राहकांचा असाच प्रतिसाद राहील, अशी आम्हाला आशा आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. मास्क व सॅनिटायझरशिवाय आम्ही कोणालाच दुकानात प्रवेश देत नाही.
- सुबोध जोशी, मुंबई स्वीट्स, टिळकनगर
यंदा सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनास भाविकांना मनाई केली असली, तरी लोक एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे मिठाईची विक्री वाढली आहे. आमच्या दुकानात दरवर्षी मोदकांमध्ये नवीन प्रकार उपलब्ध असतो. यंदा ग्राहक वाढल्याने चार ते पाच अतिरिक्त कामगार गणेशोत्सव कालावधीसाठी दुकानावर ठेवले आहेत. यंदाची मिठाई खरेदी आमच्यासाठी जॅकपॉट आहे.
- जगदीश चंदानी, सावन मिठाई मार्ट, सायन