बांगलादेशींंना बनावट पासपोर्ट देणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:36+5:302020-12-15T04:24:36+5:30
मागील सात वर्षांत भारतात ८५ बांगलादेशींची घुसखोरी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून ...
मागील सात वर्षांत भारतात ८५ बांगलादेशींची घुसखोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा राज्य दहशतवादविरोधी पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी ४ बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या एकूण ८ जणांना अटक करण्यात आली. या टोळीने गेल्या ७ वर्षांत ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पारपत्र तयार करून दिल्याचे समोर आले.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंंबर रोजी शिवडीतून अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (२८) या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. तो घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. येथे त्याच्या वास्तव्यासाठी वडाळ्यातील नूर नवी आणि मुंब्रा येथील रफिक शेख यांच्यामार्फत आधारकार्ड, पॅनकार्ड व भारतीय पारपत्र मिळाले. त्यानुसार शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.
तपासादरम्यान रफिक रहमतुल्ला सय्यद (४२) याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो २०१३ पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करतो. त्याने आतापर्यंत ४४६ लोकांचे पासपोर्ट काढून दिले आहेत. यामध्ये ८५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
यात, भारतात घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश करून बनावट भारतीय ओळखपत्र, पारपत्र बाळगणारा अक्रम याच्यासोबत मोहम्मद सोहेल अब्दुल सुभान शेख (३३), अब्दुलखैर समसुलहक शेख (४२), अबुल हाशम ऊर्फ अब्दुल काशम शेख (२६) अशा ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांना मदत करणारे इद्रिस मोहम्मद शेख, नितीन निकम आणि अविन केदारे यांनाही अटक करण्यात आली.
अक्रमकडून ३ मोबाइल, ७ बांगलादेशी सिमकार्ड, १८ भारतीय सिमकार्ड व विविध बँकांचे ८ एटीएम कार्ड कागदपत्रांसह ८ लाख ३० हजार ७३० रुपये सापडले.
....................
तर रफिक शेखकडे वेगवेगळी तीन पॅनकार्डसह वाहन चालक परवाना, डेबिट कार्ड, दोन मोबाइल फोन आणि ४४६ पारपत्रधारकांचे अर्ज आणि अर्ज नोंदणी डायरी जप्त करण्यात आली आहे.
.....