मुंबई : प्लेसमेंट एजेन्सीच्या नावाखाली नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी कंपनी चालकासह दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याने तब्बल ५६६ जणांची फसवणूक करत लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगर १ मध्ये वरु ण गुप्ता (वय ३३) याने अॅक्रोस करीयर प्राईव्हेट मॅनेजमेंट लिमिटेड नावाने प्लेसमेंट एजेन्सी सुरु केली होती. एप्रिल २०१५ पासून ही कंपनी कार्यरत होती. विविध वृत्तपत्रांमध्ये बँक आॅफिसमध्ये नोकरीची संधी अशा जाहिरीती देऊन तो तरुणांना आकर्षित करत होता. वृत्तपत्रांमधील जाहिराती पाहून अनेक तरुण, तरुणी या कंपनीकडे येत होते. नोकरी लावण्याचे अमिष देत गुप्ता तरुणांकडून प्रत्येकी ५००० हजार रुपये घेत होता. पैसे भरुनही नोकरी मिळत नसल्याने काही तरुणींनी गुप्ताकडे पैसे परत देण्यास तगादा लावला होता. मात्र गुप्ता संबंधीतांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असे. कंपनीच्या कार्यालयात अनेक चकरा मारल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ४ मैत्रीणींनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. तपासाअंती पोलिसांनी मालक वरुण गुप्ता (३३), कर्मचारी मार्कंड दत्तात्रय एरंडे (२९) यांना अटक केली आहे. गुप्ताला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये त्याÞच्याकडे काम करत असलेला आरोपी मार्कंड हा संदेश सावंत नावाने नोकरीसाठी येणाऱ्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांना न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.