इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:05 AM2023-11-25T10:05:49+5:302023-11-25T10:06:27+5:30

विमानतळावर बनावट कागदपत्रांद्वारे जाणाऱ्या ८ जणांना अटक, म्होरक्याचा शोध सुरू

Gang exposed for not knowing English; 8 people were arrested at the mumbai airport itself | इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक

इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक

लोकमत न्यूज  नेटवर्क
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट कागदपत्रांद्वारे इंग्लंडला निघालेल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मर्चंट नेव्हीमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, इंग्रजी बोलता येत नसल्याने, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशीत त्यांचा पर्दाफाश झाला. या ८ प्रवाशांकडे मुंबई ते लंडन फ्लाइटचे बोर्डिंग पास होते.

अटकेदरम्यान पोलिसांनी सीडीसी (कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट-कम-सीफरर्स आयडेंटिटी डॉक्युमेंट) यासह बनावट कागदपत्रे जप्त केली. बनावट ई-स्थलांतरित पत्रे, बनावट जहाज जॉइनिंग लेटर, बोर्डिंग पास आणि पासपोर्ट. कुरेशीने अनेक भारतीयांना ब्रिटनमध्ये स्थायिक करून, या बेकायदेशीर कृत्यातून  पैसा कमावल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर कुरेशी त्यांना तेथील नागरिकत्व मिळवून देण्यासाठी मदत करायचा.  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या व्यक्तींमध्ये दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप सिंग, सुशील पाल, जसविंदर पॉल, कुशलप्रीत सिंग आणि कुलजीत सिंग यांचा समावेश आहे. 
इमिग्रेशन अधिकारी गणेश माधव गवळी, रणजीत कुमार आणि श्याम सुंदर सिंग हे विमानतळावरील काउंटरवर तैनात असताना, आठ जणांच्या संशयास्पद हालचाली त्यांनी टिपल्या. त्यानुसार, त्यांना ताब्यात घेत चौकशी करताच, वरील धक्कादायक प्रकार समोर आला. 
मर्चंट नेव्हीमध्ये सहभागी होण्यासाठी यूकेला जात असल्याचा दावा प्रवाशांनी केला. मात्र, त्यांना इंग्रजी बोलता येत नव्हते. संशय आल्याने अधिकारी गवळी, कुमार आणि सिंग यांनी त्या व्यक्तींना प्रभारी अधिकारी विक्रम कुमार आणि कर्तव्य अधिकारी राजन नागपाल यांच्याकडे नेले. त्यांची सीडीसी, ई-मायग्रंट पत्रे आणि शिपिंग कंपनीशी शिप जॉइनिंग लेटरची पडताळणी केल्यानंतर, कागदपत्रे बनावट असल्याची पुष्टी झाली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांना याची माहिती दिली. 

मास्टरमाइंड अब्राहम कुरेशी...
 अब्राहम कुरेशी हा यूकेचा रहिवासी असून, तो एजंटांमार्फत भारतीय नागरिकांना यूकेमध्ये स्थायिक होण्याचे आमिष दाखवितो.
 प्रत्येकी २५ लाख रुपये आकारत होता. कुरेशीने विशेषत: गुजरात, पंजाब आणि तामिळनाडूमधील लोकांना लक्ष्य करायचा. 
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी यूके हे पसंतीचे ठिकाण आहे.

कुरेशी हे रॅकेट कसे चालवितो?
कुरेशी भारतातील एजंटांच्या नेटवर्कद्वारे हे रॅकेट चालवितो. यूकेमध्ये त्यांचे कायमस्वरूपी निवासस्थान सुलभ करण्यासाठी आणि एजंटांना कमिशन देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून २५ लाख रुपये घेतात. पुढील ३- ४ दिवसांत जहाजे यूके डॉकवर कधी येतील, हे निर्धारित करण्यासाठी कुरेशी थेट जहाज ट्रॅकिंग डेटाचे निरीक्षण करतो. त्यानंतर, तो उमेदवारांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यूकेला जाण्यासाठी विमान तिकीट बुक करण्याची सूचना देतो. कुरेशी मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेली जहाजे, स्थलांतरित पत्रे आणि सीडीसी दस्तऐवजांसाठी बनावट जॉइनिंग लेटरही तयार करतो. कुरेशी पूर्ण झालेल्या मर्चंट नेव्ही कोर्सेसशी संबंधित बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी भारतातील एजंट्स त्याला सहकार्य करत होते. कुरेशीने अटक केलेल्या व्यक्तींच्या अनेक मित्रांना यापूर्वीच यूकेला पाठवत, यूकेचे नागरिकत्वही मिळवून दिले आहे. 

Web Title: Gang exposed for not knowing English; 8 people were arrested at the mumbai airport itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.