मुंबईतून डी गँगची सूत्रे हलविणा-याला बेड्या, एका महिलेसह लंगडा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:27 AM2017-09-26T03:27:35+5:302017-09-26T03:27:49+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारुक याचा भाऊ अहमद मन्सूर उर्फ लंगडा (६५) याला सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारुक याचा भाऊ अहमद मन्सूर उर्फ लंगडा (६५) याला सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली आहे.
मुंबईच्या जे.जे. मार्ग येथील टिमकर मोहल्ला परिसरात अहमद लंगडा (६५) हा कुटुंबीयांसोबत राहतो. अहमद अंकल म्हणून तो प्रसिद्ध आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला राहत्या घरातून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. इक्बाल कासकरच्या चौकशीतून अहमदचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई
केल्याचे समजते. अहमद याचा भाऊ कराचीमध्ये दाऊदसोबत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
२०१३ मध्ये छोटा शकीलच्या नावाने काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांना धमकाविल्याप्रकरणी अहमद मन्सूर उर्फ लंगडा याला मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. विशेष म्हणजे दाऊद टोळीतील अहमद लंगडा याला पोलीस वर्तुळात खबºया म्हणून संबोधले जाते. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली, पण त्याला निर्दोष ठरवण्यात आले होते. चांद मदार हत्येप्रकरणीही तो साक्षीदार आहे. तसेच त्याने डिझेल माफिया मोहम्मद अली याच्याविरोधात साक्ष दिली होती. हाच मुंबईतून डी गँगची सूत्रे हलवित असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही शर्मा यांच्या पथकाने अटक केली.
मूळची मुंब्रा येथील रहिवासी असलेली सना सोमवारी तिच्या प्रियकराच्या तारखेसाठी शिवडी कोर्टात आली असताना ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या माझगाव येथील एका हॉटेलमधून तिचे व्यवहार चालायचे अशीही माहिती समोर येत आहे. दोघांचे डी गँगशी कनेक्शन समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अनेक जण अंडरग्राउंड होत आहेत.
सट्टेबाजांकडे शर्मांचा मोर्चा
कासकर आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीतून मुंबईत सुरू असलेला डी गँगचा कोट्यवधीचा सट्टेबाजार उद्ध्वस्त करण्यास शर्मांनी सुरुवात केली आहे. रविवारी भांडुपमधील जलाराम पार्क इमारतीच्या बी विंगमधील फ्लॅटमधून पाच आरोपींना मुंबई पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
ही मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटवर कोट्यवधी रुपयांची बेटिंग येथूनच लावत होती. ललित छेडा, जितेंद्र पटेल, दीपक बिंडे, सुनील प्रित्यानी अशी अटक आरोपींची नावे आहेत. बुकी राजू सिंगोईमार्फत ही बेटिंग सुरू होती. त्यांच्याकडून ९ मोबाइल, ३ लॅपटॉपसह महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आले.
याच फोनद्वारे रिसिव्हर बॅटºयांच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मिनी टेलिकॉम एक्स्चेंज चालवून त्याद्वारे क्रिकेटवर बेटिंग लावली जात होती. या कारवाईतही श्रेय घेण्यावरून मुंबई आणि ठाणे पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.