Join us

बारगर्लसह झारखंडची टोळी गजाआड

By admin | Published: September 30, 2015 12:46 AM

बारगर्लसह झारखंड येथील लुटारूंनी मुलुंडच्या ज्वेलरी शॉपमधून पावणेतीन कोटींचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : बारगर्लसह झारखंड येथील लुटारूंनी मुलुंडच्या ज्वेलरी शॉपमधून पावणेतीन कोटींचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बारगर्लसह चौघांना अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ७ आणि दरोडाविरोधी पथकाला यश आले. फिरोज गोहरअली शेख, सुजाल मकबुल हाजी शेख, हसन शेख नजीर हुसेन शेख आणि साजिदा शेख असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मुलुंड पूर्व संत रामदास मार्गावर राहणारे सराफ सुहास पुरुषोत्तम खेडकर (५४) यांचे हनुमान चौकात सुवर्णकार नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. २० सप्टेंबरच्या रात्री या टोळीने दुकानात एसीच्या डक्टमधून आतमध्ये प्रवेश केला. कुणाला संशय येऊ नये, म्हणून एसीला प्लास्टिक झाकणाचा आधार दिला. दुकानातील जवळपास पावणेदोन कोटींचे दागिने घेऊन ही टोळी फरार झाली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. त्यानुसार एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, अशोक खोत, सतीश तावरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, विजय कदम, राजेंद्र करणकोट, प्रवीण पाटील, सपना क्षीरसागर, संतोष मस्तुद, नागेश पुराणिक यांच्यासह तपास पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार रे रोड स्टेशन परिसरात फिरोज, सुजाल आणि हसन हे त्रिकूट दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, २६ सप्टेंबर रोजी या त्रिकूटाला अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात ही टोळी मूळची झारखंड येथील असून गेल्या महिनाभरापासून ज्वेलर्सच्या दुकानालगत ते भाड्याने राहत होते. त्याच परिसरात फळे आणि शहाळे विकण्याचा बनाव केला. दुकानाची रेकी केल्यानंतर संधी मिळताच या सहा जणांच्या टोळीने दुकानातील दागिने लंपास केले. त्यातही डोंबिवली येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत असलेल्या बारगर्लकडे त्यांनी हे दागिने सांभाळण्यासाठी दिले होते. याची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी डोंबिवली येथून साजिदाच्याही मुसक्या आवळल्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणी सध्या फरार असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)