मुंबई : मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर पडलेल्या १९ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पुढील तपासासाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मूळची जालनाची रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी एचआयव्हीग्रस्त आहे. दोन महिन्यांपासून ती मुंबईत भावासोबत राहते. १४ तारखेला तिची प्रकृती खालावल्याने, तिला पक्षाघात झाल्याचा संशय त्याने वडिलांकडे वर्तविला. वडिलांनी मुलीकडे धाव घेतली. त्यानंतर काही दिवसांनी तिला घेऊन त्यांनी औरंगाबाद गाठले. तेथेही प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्याने, तेथील रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. अखेर, मुलीला विश्वासात घेत त्यांनी विचारणा केली तेव्हा तिने दिलेल्या माहितीत, ७ जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसावरून परतत असताना तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे तिने सांगितले. मात्र त्या व्यक्ती कोण आहेत, याबाबत तिने अधिक माहिती दिलेली नाही. तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर तेथीलच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात तिच्यावर अत्याचार झाल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. मात्र अत्याचार केलेल्यांची नावे ही तरुणी सांगू शकलेली नाही. ही माहिती मिळताच तिच्या वडिलांनी मंगळवारी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने चार अनोळखी तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप मुंबई पोलिसांना याबाबतची कागदपत्रे मिळालेली नाहीत. ती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली.