Join us

व्यापाऱ्यांना गंडा घालणारी टोळी गजाआड

By admin | Published: April 02, 2016 2:30 AM

काळ्या कमाईतील सुट्या पैशांच्या बदल्यात हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दाखवत लुटीचा बनाव करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला भांडुप पोलिसांनी गजाआड केले.

मुंबई : काळ्या कमाईतील सुट्या पैशांच्या बदल्यात हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दाखवत लुटीचा बनाव करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला भांडुप पोलिसांनी गजाआड केले. या आरोपींकडून ३ लाख ५७ हजार रुपये आणि ११ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. घाटकोपर (पूर्व) परिसरात आकाश गांधी यांचे हॉटेल असून त्यात प्रभू बालाकृष्णन उर्फ बाबूभाई हे भागीदार आहेत. गांधी यांना हॉटेल व्यवसायामुळे सुट्या नोटांची गरज भासत असे. बाबूभाई यांच्या गावाकडील दिनेश नावाच्या इसमाने आपल्या एका परिचिताकडे ५० व १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात १५ लाख रुपये असून त्याबदल्यात हजारांच्या नोटा स्वीकारण्याचा प्रस्ताव आकाश गांधी यांच्यासमोर ठेवला. त्यानुसार दिनेशशी बोलणी करण्यासाठी बाबूभाई यांनी त्यांचे मित्र केवल जैन उर्फ मदन मेहता व हरिश्चंद्र जयस्वाल उर्फ राजू यांच्यासोबत भांडुप येथील हॉटेलमध्ये बोलावले. त्या ठिकाणी केवल जैन याने आपली राजकीय लोकांमध्ये चांगली ओळख असून ते काळे धन आपल्याकडे ठेवण्यासाठी देतात. त्यात ५० ते १०० रुपयांच्या नोटा असल्याने ते १००० रुपयांच्या नोटांमध्ये बदलावयाच्या असल्याचे सांगितले. गांधी यांनी १५ लाख रुपयांचे सुट्या नोटा घेण्याची तयारी दाखवली. त्यानुसार केवल शर्मा व जयस्वाल यांनी गांधी यांना १८ जानेवारीला चेंबूरच्या छेडा नगर येथे भेटण्यासाठी बोलावले. गांधी स्वत:कडील ८ लाख रुपये व त्यांचे मित्र स्मित शहा यांच्याकडील ७ लाख रुपये घेऊन मानखुर्द, छेडानगर तेथे थांबले. त्या वेळी राहुल नावाच्या व्यक्तीने केवल मेहता यांचे नाव सांगून त्यांना एका हॉटेलमध्ये नेले. तेथे १०० रुपयांचे एक बंडल दाखवून राहुलने बाकीची रक्कम गाडीत असल्याचे सांगून गांधी व शहा यांच्याकडील १५ लाख रुपये घेतले. तेथून ते सर्व जण हायवेकडे येत असताना भरधाव टॅक्सीतून आलेल्या अनोळखी इसमांनी राहुलला पैशाच्या बॅगेसह टॅक्सीत खेचून घेत मानखुर्दच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणाची तक्रार भांडुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली भांडुप पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कानडे, उपनिरीक्षक शिवशंकर भोसले, राहुल सावंत यांच्या तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास पथकाने लुटीचा बनाव करणाऱ्या हरिश्चंद्र जयस्वाल (३९), केवल मेहता (५१), राकेश यादव (३५) यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पंतनगर परिसरातील विलास बनसोडे (५४), तर मानखुर्द परिसरातून अशोक पवार (३६) आणि कांजूरमार्ग येथून श्रीमंतकुमार पाणिग्रही (२७) यांना अटक करण्यात आली आहे. केवल याच्याविरुद्ध फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल आहेत तर उर्वरित पाचही अभिलेखावरील आरोपी आहेत. त्यांच्याकडून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)