‘मेल-एक्स्प्रेस’ प्रवाशांवरही फटका गँगची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:14 AM2018-04-04T05:14:33+5:302018-04-04T05:14:33+5:30
रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजित भरत झाडे (१९) आणि दीपक शंकर ठोकळ (२०) अशी या दोघांची नावे असून, हे दोघे कल्याण येथे राहणारे आहेत.
मुंबई - रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजित भरत झाडे (१९) आणि दीपक शंकर ठोकळ (२०) अशी या दोघांची नावे असून, हे दोघे कल्याण येथे राहणारे आहेत. या दोघांकडून रेल्वे पोलिसांनी १ लाख ९६ हजारांचे एकूण २० मोबाइल जप्त केले आहेत. यामुळे लोकलच्या दरवाज्यांवरील प्रवाशांसह फटका गँगने रोख आता मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांकडे वळविल्याचे समोर आले आहे.
सातारा येथे राहणारे योगेश जाधव हे सिंहगड एक्स्प्रेसने जनरल बोगीतून प्रवास करत होते. कल्याण स्थानक येण्यापूर्वी दोन तरुणांनी त्यांच्या हातावर फटका मारत मोबाइल खाली पाडला. या प्रकरणी योगेशने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, अशी माहिती लोहमार्ग मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना, वालधुनी पुलाजवळ फटका पद्धतीने मोबाइल आणि मौल्यवान वस्तू चोरी करणाºयांची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. यानुसार, सापळा रचत वालधुनी पुलाजवळ जाताना दोन तरुणांची चौकशी केली. पण समाधानकारक उत्तर न मिळल्यांने रेल्वे पोलिसांनी अजित झाडे आणि दीपक ठोकळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या गुन्हेगारांनी फटका मारून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले मोबाइल कल्याणमधील संजय मोरे या व्यक्तीला विकत असल्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलिसांना दिली.