मुंबई - वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे दर तीन वर्षांनी दिला जाणारा ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ या वर्षी मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथाकार प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या लेखकाच्या लेखनातली नावीन्य, मौलिकता लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी साहित्यिकाची निवड केली जाते. पंचवीस हजार रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी समीक्षा क्षेत्रातले दिग्गज समीक्षक डॉ. सुधा जोशी आणि डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी एकमताने प्रज्ञा दया पवार यांची निवड या पुरस्कारासाठी केली. प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या लेखनात, विशेषत्वाने कवितेत दाखवलेले नावीन्य आणि त्यांच्या लेखनाची मौलिकता लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दि. १५ सप्टेंबर या गाडगीळांच्या स्मृतिदिनी या पुरस्काराची घोषणा पॉप्युलर प्रकाशनातर्फे करण्यात आली आहे. गंगाधर गाडगीळांनी १९८३ साली ‘वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधी’ सुरू केला होता. १९९३ साली त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या तिघा मुलांनी -- कल्पना गटमन, अभिजित गाडगीळ आणि चित्रलेखा गाडगीळ यांनी -- या विश्वस्त निधीत भर घालून ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कारा’ची योजना तयार केली. १९९४ साली या पहिल्या पुरस्कारासाठी श्याम मनोहर यांची निवड करण्यात आली होती.
गंगाधर गाडगीळ हे पॉप्युलर प्रकाशनाचे पहिले लेखक. त्यांचे आणि रामदास भटकळ यांचे मैत्र लेखक-प्रकाशक नात्यापलीकडचे होते. त्यामुळेच हा पुरस्कार द्यायचे जेव्हा निश्चित झाले त्यावेळी त्याची जबाबदारी पॉप्युलर प्रकाशनाने घ्यावी अशी इच्छा गाडगीळांनी व्यक्त केली. खरेतर तेव्हा गाडगीळ अनेक साहित्य संस्थांशी संबंधित होते. अशाच एखाद्या संस्थेकडे ही जबाबदारी सोपवणे योग्य ठरेल, असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न भटकळांनी केला तेव्हा, “माझ्या दृष्टीने पॉप्युलर प्रकाशन ही देखील एक साहित्य संस्थाच आहे,” असे गौरवोद्गार गाडगीळांनी पॉप्युलरविषयी काढले होते.
गाडगीळांनी सोपवलेली ही जबाबदारी गेली अठ्ठावीस वर्षे पॉप्युलरने आनंदाने पार पाडली आहे. या अठ्ठावीस वर्षांत एकूण नऊ पुरस्कार दिले गेले. श्याम मनोहरांनंतर रत्नाकर मतकरी, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, मकरंद साठे, राजीव नाईक, जयंत पवार आणि प्रवीण बांदेकर या लेखकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
प्रज्ञा दया पवार यांनी कथा, नाटक या वाङ्मयप्रकारांतही लेखन केले असले तरी त्या प्रामुख्याने कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी महाविद्यालयीन काळातच लेखनाला सुरुवात केली. ‘अंतस्थ’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९९३ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’, ‘आरपार लयीत प्राणांतिक’ आणि ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या शिवाय ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक आणि ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रहही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनाने केले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक दया पवार यांच्या त्या कन्या आहेत.