मराठी साहित्यातील प्रायोगिक आणि नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांचा गौरव करण्याच्या हेतूने मराठी नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांनी १९९३ साली 'वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधी'ची स्थापना केली. या निधीतर्फे दर तीन वर्षांनी 'गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार' दिला जातो.
या पुरस्कारासाठी नावीन्यपूर्ण, प्रयोगशील लेखन करून मराठी साहित्याला नवी दिशा दाखविणाऱ्या व ज्याच्या लेखनात नवनिर्मितीचे आश्वासन आहे अशा लेखकांचा विचार केला जातो. १९९४ पासून ह्या पुरस्काराची सुरुवात झाली असून यापूर्वी हा पुरस्कार, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, मकरंद साठे, राजीव नाईक, जयंत पवार यांना प्रदान करण्यात आला आहे. वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे हे पंचविसावे वर्ष असून २०१८ या वर्षीचा नववा पुरस्कार कवी, कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा दि. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.