मुंबई - नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेतही राज ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे भाजपा आणि मोदीविरुद्ध प्रचार केला. मात्र, राज ठाकरेंच्या या सभेची आणखी एक वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण, ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबले आहेत. त्यावरुन, भाजपाने राज ठाकरेंवर टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच भाजपाचे हे दोन्ही नेते जनतेला फसवत आहेत, असे म्हणत राज यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोदी सरकारला टार्गेट केलं. तर, या सभेत राज यांनी भाजपाच्या डीजिटल इंडियाच्या जाहिरातीमधील मॉडेलच व्यासपीठावर आणला होता. त्यामुळे राज यांची सोलापुरातील सभा वेगळीच ठरली आहे. दरम्यान, याच हॉटेलमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही याच हॉटेलात होते, अशीही माहिती आहे.
सोलापूर दौऱ्यावेळी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्याच दिवशी उतरले होते. राज ठाकरेंचा सोलापूर तर शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा एकाच दिवशी होता. विशेष म्हणजे एकाचवेळी दोन्ही नेत्यांच्या सभा आजुबाजुच्या जिल्ह्यात झाल्या. राज आणि पवार यांच्या एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची बातमी येताच, भाजपाने राज ठाकरेंवर टीका केली आहे. 'कर्ता' आणि 'करविता' यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे. कारण "गंगाधर ही शक्तिमान है" हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
असे म्हणत भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे आणि शरद पवार एकच आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळेच कर्ता आणि करविता एकत्र आले, असेही भाजपाने म्हटले.