मुंबई : भांडुप ते नाहूरदरम्यान घडलेल्या लोकलच्या अपघातात रेल्वेचे गँगमन लक्ष्मण भगत यांना आपला एक हात गमवावा लागल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भगत (५८) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सकाळी ८च्या सुमारास भांडुप ते नाहूरदरम्यान काम करीत होते. भगत हे डाऊन धीम्या मार्गावर आपल्या एका सहकाऱ्यासोबत, तर अन्य सहकारी हे बाजूच्या ट्रॅकवर काम करीत होते. भगत यांचा एक सहकारी रुळाचा नटबोल्ट आणण्यासाठी तेथून निघून गेला. त्याचवेळी ट्रॅकवर उलट्या दिशेला उभे असणारे भगत हे काम करीत होते. त्यामुळे त्यांना डोंबिवलीला जाणारी लोकल येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यांनी मागे वळून पाहताच लोकल येत असल्याचे दिसले. त्यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला; मात्र या प्रयत्नात त्यांना लोकलची धडक बसल्याने उजवा हात तुटून बाजूच्या ट्रॅकवर पडला. या घटनेनंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
लोकलच्या धडकेत गँगमनने गमावला हात
By admin | Published: December 28, 2015 3:09 AM