बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:24 AM2020-02-13T01:24:09+5:302020-02-13T01:24:15+5:30
गणेशपुरी ठरतेय गुन्ह्यांचे प्रमुख केंद्र : गुन्हे शाखेकडून चोरी प्रकरणांचा तपास सुरू
मुंबई : मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबईतल्या बिल्डरांचे कोट्यवधी रुपयांचे बांधकाम साहित्य चोरणाºया एका टोळीला मुंबई गुन्हे शाखेने
बेड्या ठोकल्या. अशा अनेक टोळ्या अजूनही मोकाट आहेत. कधी काळी मुंबईत या टोळ्यांचा सुळसुळाट होता. सध्या गणेशपुरी हे या टोळ्यांचे प्रमुख केंद्र बनत चालल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दिशेने गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
वाडा किंवा अन्य ठिकाणांहून मुंबई महानगर प्रदेशातील बिल्डरांनी बांधकामासाठी मागवलेल्या लोखंडी सळ्या या टोळ्या ट्रेलरचालक, वजन काटे हाताशी धरून मधल्या मध्ये चोरतात. विश्वसनीय सूत्रांनुसार, सध्या या टोळ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. स्थानिक पोलिसांच्या मेहेरबानीमुळे त्यांचे गुन्हे फोफावत असल्याचा आरोप होत आहे.
या टोळ्या मालवाहू ट्रेलरचालकांना कमिशनचे आमिष, ठार मारण्याची धमकी देत हाताशी घेतात. ट्रेलरमधील शंभर-दोनशे किलोपासून दोन-चार टनांपर्यंत माल चोरतात. चोरलेल्या मालाइतक्याच वजनाचे दगड-माती, पाणी भरून ट्रेलर ठरलेल्या वजनकाट्यावर उभा करतात. बिल्डरने जितक्या सळ्या मागवल्या तितक्याच वजनाची पावती, चलान मिळवतात. यात अनेकदा बिल्डरचीच माणसे सहभागी असतात. चोरलेला माल ते बाजारभावापेक्षा स्वस्त दराने विकतात.
भिवंडी-वाडा रोड, शिरसाड फाटा आदी ठिकाणी असलेली गोदामे, ढाब्यांचे आवार, तसेच मुख्य रस्त्याशेजारील मोकळ्या भूखंडांवर लोखंडी शिगांसह धान्य, महागडी रसायने अशाच पद्धतीने मधल्या मध्ये चोरली जातात. या चोरीचा पत्ता खरेदीदार व्यावसायिकाला लागत नाही. याबाबत कोकण परिक्षेत्राचे प्रमुख निकेत कौशिक आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.
हाफिज, बक्कल, कलीम यांच्या टोळ्या
गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबाडी गाव, शिरसाड फाटा रोड येथील मातोश्री स्टील नावाचे गोदाम, मापोली गावातील अल्फा हॉटेल शेजारील वीटभट्टी, रुदरी गाव-अंबाडी फाट्याशेजारी, भिवंडी-वाडा रोडवरील मधू मंजुळा हॉटेल शेजारी या टोळ्यांचे ठरलेले अड्डे आहेत. तसेच पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, पेट्रोल पंपाशेजारी साईबाबा स्टील गोदाम येथेही अड्डे आहेत. हाफिज मलिक, जमिरउल्लाह खान उर्फ बक्कल, कलीम साहेबुल्लाह खान हे टोळी प्रमुख असल्याची माहिती मिळते.