गँगस्टर आणि सेना पदाधिकारी मयूर शिंदे गजाआड
By admin | Published: July 7, 2016 12:49 AM2016-07-07T00:49:58+5:302016-07-07T00:49:58+5:30
खंडणीसाठी ठेकेदाराला धमकाविल्याप्रकरणी गँगस्टर आणि सेनेचा पदाधिकारी मयूर शिंदेला कांजूर पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला ११ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी
मुंबई : खंडणीसाठी ठेकेदाराला धमकाविल्याप्रकरणी गँगस्टर आणि सेनेचा पदाधिकारी मयूर शिंदेला कांजूर पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला ११ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनसुख नाका येथील कंपनी बंद पडली होती. त्या ठिकाणी खड्डे खणण्याचे काम तक्रारदार ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम आपल्याला मिळावे म्हणून शिंदेने त्याच्या साथीदारासह ठेकेदाराला मारहाण केली. त्याला धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जूनमध्ये कांजूर पोलीस ठाण्यात शिंदेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिराने कांजूर पोलिसांनी मयूरला भांडुप परिसरातून अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात मयूर घोनेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कांजूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एल. सातपुते यांनी दिली.
विकासक वैभव कोकाटे यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी नोव्हेंबर २०११ मध्ये शिंदेने गोळीबार केला होता. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला असून सध्या शिवसेना आमदाराच्या आश्रयाला आहे. त्याला शिवसेनेकडून पदही देण्यात आले आहे. यापूर्वी भांडुप सोनापूर येथील वाहतूक चौकीत पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)