गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती
By नारायण जाधव | Published: December 26, 2022 09:08 AM2022-12-26T09:08:42+5:302022-12-26T09:09:25+5:30
राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते.
नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक
राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. मात्र फळमार्केटमधील व्यापारी प्रमोद पाटे यांना १० ते १५ गुंडांनी कार्यालयात घुसून, मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व संगणक पळवून नेल्याच्या घटनेने या बाजार समितीची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. या घटनेने बाजार समितीतील विविध टोळ्यांची दहशत आणि सावकारी पाश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे फळमार्केटपासून ५०० मीटरच्या अंतरावर पोलिस स्टेशन आहे.
बाजार समितीची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा असूनही मार्केटमध्ये घुसून गुंडांनी व्यापाऱ्यास मारहाण केली आहे. तसे पाहिले तर गुंडगिरी, सावकारी यांचे बाजार समितीशी जुने नाते आहे. अगदी मुंबईत क्रॉफर्ड मार्केटला ती असल्यापासून. पूर्वी तिथे या बाजार समितीत बाबू रेशीम, रमा नाईक, अरुण गवळी, दाऊद इब्राहिम या टोळ्यांची मोठी दहशत होती. कालांतराने तिचे नवी मुंबईत स्थलांतर झाले. सोबत या टोळ्यांचाही नवी मुंबईत शिरकाव झाला. तिकडे जेएनपीटीत छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम टोळ्यांचे वर्चस्व राहिले. तस्करी आणि जहाजातील मालाची चोरी, तेल भेसळ हे सर्व व्यवसाय नवी मुंबईत आले.
यात उत्तरेतील काही गुन्हेगार समुद्रात दहशत माजवू लागले. यातून अनेक राजकारण्यांचा जन्म झाला. काहींनी मुंबई, नवी मुंबईत नगरसेवकपदासह राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शिरकाव केला. जेएनपीटीत आलेला माल बाजार समितीत आणण्यासाठी शीतयुद्ध सुरू झाले. तसे पाहता बाजार समितीच्या मसाला, साखर आणि धान्य बाजारात गुजराती, कांदा-बटाटा बाजारात सिंधी, गुजराती आणि भाजीपाला बाजारात मराठी तर फळबाजारात मराठींसह मुस्लिम व्यापाऱ्यांचे वर्चस्व राहिले आहे.
- आधी दाणाबंदर, कांदा-बटाटा आणि नंतर १९९० च्या दशकात फळ आणि भाजीपाला मार्केटचे नवी मुंबईत स्थलांतर झाले. त्यावेळी अनेक व्यापारी, माथाडी कमरेला रिव्हाॅल्व्हर लावून फिरत होते. पण त्यांना हटकण्याची हिंमत पोलिसांमध्येही नव्हती.
- जकात चुकविण्यासाठी बाजार समितीतून मुंबईत जाणारा शेतमाल हा हक्काचे साधन होता. अनेकदा शेतमालाच्या नावाखाली सोने-चांदी, ड्रग्ज, मसाल्याचे पदार्थ थेट मुंबईत जात होते.
- शिवाय डाळी-कडधान्य, शेंगदाण्याच्या आडून सुका मेवा, मसाल्याच्या पदार्थांची जकातचाेरी सुरू होती. हा प्रकार थांबविल्यानेच तत्कालीन सदस्य सचिव अण्णाराव तांबाळे यांची कार्यालयीन इमारतीखालीच गोळ्या झाडून हत्या झाली होती.
- बाजार समितीच्या सर्वच बाजारपेठांमध्ये रोखीने मोठे व्यवहार होतात. त्यासाठी दिवसाला व्याजाने पैसे देणारे-घेणारे अनेक व्यापारी, सावकार बाजार आवारात आहेत. त्यातूनच मारहाण झाल्याची चर्चा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"