Join us

गँगस्टर कुमार पिल्लईला सिंगापूरमध्ये अटक

By admin | Published: February 19, 2016 3:26 AM

गुंड अमर नाईकच्या टोळीत एेंशीच्या दशकात दाखल झालेला आणि पूर्व उपनगरांत खंडणी वसूल करणाऱ्या कुमार पिल्लई याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : गुंड अमर नाईकच्या टोळीत एेंशीच्या दशकात दाखल झालेला आणि पूर्व उपनगरांत खंडणी वसूल करणाऱ्या कुमार पिल्लई याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली. बऱ्याच काळापासून तो तेथे राहात असावा. त्याला येथे आणण्यासाठीची प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर (सीबीआय) खात्याने सुरू केली असून, पिल्लईविरुद्ध दाखल झालेल्या जवळपास अर्धा डझन प्रकरणांचा तपशील मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे सीबीआयला पाठवण्यात येत आहे. वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कुमार पिल्लई अमर नाईकला जाऊन मिळाला होता.मुंबईत गोळीबार, खंडणी वसुली असे जवळपास अर्धा डझन गुन्हे पिल्लईविरुद्ध दाखल आहेत. त्याने मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिशिर शिंदे यांना धमकावलेही होते. आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या संपर्कात असलेल्या सीबीआयकडे आम्ही पिल्लईविरुद्ध असलेल्या खटल्यांचा तपशील पाठवत आहोत व सीबीआय त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखेतील सूत्रांच्या माहितीनुसार, पिल्लईचे बरेचसे साथीदार सध्या तुरुंगात आहेत. त्याने पूर्व उपनगरांतील (विशेषत: विक्रोळीत) बिल्डर्सना खंडणीसाठी लक्ष्य केले होते. कारण विक्रोळीत त्याचा जम बसलेला होता. त्याचे वडील कृष्णा पिल्लई हे तस्कर होते. त्यांना दाऊदच्या टोळीतील सुहास मकडावाला याने ठार मारले. ही हत्या लाल सिंग चौहान या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून झाल्याची चर्चा होती. पिल्लई अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईकचा मित्र बनला व त्याने वडिलांच्या हत्येचा सूड घ्यायची प्रतिज्ञा केली. चौहानला ठार मारेपर्यंत चप्पल वापरणार नाही आणि दाढी करणार नाही असा त्याने निश्चय केला होता. नंतर चौहानला त्याने बोरीवलीत ठार मारलेही. अमर नाईकचा पिल्लई उजवा हात होता. श्रीलंकेत एलटीटीईकडून शस्त्रांची तो गुन्ह्यांसाठी तस्करी करायचा. अमर नाईकचा मृत्यू झाल्यानंतर तो अश्विन नाईकच्या जवळ गेला. परंतु त्याला अटक झाल्यानंतर पिल्लईने स्वत:ची टोळी तयार केली.दोन वर्षांपूर्वी त्याच्या टोळीतील लोकांनी राजेश मंडगे या कंत्राटदाराला ठार मारले. विक्रोळी, भांडुप आणि कांजूरमार्ग भागातील फेरविकासाच्या कामांमुळे मालमत्तेच्या व्यवहारांना मोठे उत्तेजन मिळाले. पिल्लईची टोळी या भागात बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सकडून खंडणी वसुलीची कामे करू लागली.