उद्या मुंबईत आणणार; बंगळुरू कोर्टाची प्रत्यार्पणाला मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा घेण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले. बंगळुरू पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश तेथील न्यायालयाने शनिवारी दिले. त्यानुसार त्याला अटक करून मुंबईला आणण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
पाच वर्षांपूर्वी विलेपार्ले पोलीस ठाण्यात येथे दाखल खंडणीसाठी एकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी तपासासाठी रवी पुजारीला खंडणी विरोधी पथक अटक करेल. त्यानंतर त्याच्यावर मुंबईसह राज्यात दाखल गुन्ह्यामध्ये अटक दाखवली जाईल, असे सहआयुक्त (गुन्हे) मिलिद भारंबे यांनी सांगितले. पुजारीला सोमवारी ट्रँझिस्ट रिमांडवर मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे.
गेली अनेक वर्षे फरार असलेल्या रवी पुजारीला गेल्यावर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथे केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. आफ्रिकेबरोबर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मुंबईत रवी पुजारीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचा ताबा घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. २०१६ मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने ८ जणांना अटक करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मुख्य फरार पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन प्रभारी अजय सावंत, सध्याचे प्रभारी सचिन कदम व त्याच्या पथकाने तेथील न्यायालयाशी प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. शनिवारी त्याला मंजुरी मिळाली असून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले.
रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे (जि. उडपी) येथील असून १९९० पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत असलेल्या पुजारीने नंतर स्वतःची टोळी बनविली. मुंबईसह बंगळुरू, मंगळूर येथील विविध व्यावसायिकावर, बॉलिवूड, बिल्डर यांच्याकडे खंडणी गोळा करू लागला. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यामध्ये मुख्य आरोपी आहे. परदेशात पलायन केल्यानंतर सहकाऱ्यांमार्फत त्याने हे काम सुरू ठेवले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजाविण्यात आली होती.