- मनीषा म्हात्रे, मुंबईइंडोनेशियन पोलिसांच्या ताब्यात असलेला राजन भारतात आल्यानंतर राजनची टोळी अधिक सक्रिय होणार आहे. राजनचा खात्मा करण्यासाठी छोटा शकील टपलेला असताना संतोष शेट्टीने शकीलसोबत हातमिळवणी केली आहे. शेट्टीने मुंबईतील अन्य टोळ्यांच्या मदतीने आपल्या टोळीच्या विस्तारास सुरुवात केली आहे. एके काळी राजनचा खास म्हणून ओळखला जाणारा गँगस्टर संतोष शेट्टी सध्या दाऊदशी संलग्न आहे. राजनच्या जिवाला धोका असताना वेळोवेळी शेट्टीने राजनला मदत केली होती. २००० मध्ये बँकॉकला झालेल्या प्राणघातक हल्ल्यात शेट्टीनेच राजनला वाचविले. त्यानंतर एका आर्थिक व्यवहारात राजन आणि शेट्टीत वाद झाला. दोघेही वेगळे झाले. मधल्या काळात शेट्टीने स्वत:चे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले. इंडोनेशियामध्येही शेट्टीचे तगडे नेटवर्क आहे. नुकताच कारागृहातून बाहेर पडलेला शेट्टी सध्या दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वीच कुमार पिल्ले गँगमधील अमित भोगलेसोबत शेट्टीची गुप्त बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत शेट्टीने अमितला आपल्यासोबत काम करण्याची आॅफर दिली. वर्र्चस्वाच्या लढाईतून भोगलेने संतोष काने उर्फ संत्या कान्याची हत्या केली होती. अनिल पांडेच्या हत्येनंतर पूर्व उपनगरात मयूर शिंदे आणि अमित भोगले या दोघांचीच चलती आहे. खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची नोंद अमित भोगलेवर आहे. विक्रोळी ते ठाणे परिसरात बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या भोगलेविरुद्ध उल्हासनगर, कल्याणमध्येही गुन्हे दाखल आहेत. अशात शेट्टाने त्याला गँगमध्ये येण्याची आॅफर दिल्यानंतर भोगलेनी त्याला पाठिंबा दिल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजले. त्यामुळे भोगलेसह मुंबईतील अन्य गँगस्टरनाही टोळीत सहभागी करुन घेण्याची धडपड सध्या शेट्टीने चालविली आहे. या लढाईत मुंबईत गँगवार भडकण्याची शक्यता पोलीस खात्यातील सूत्रांनी वर्तवली आहे. शेट्टी दाऊदच्या संपर्कात?राजन भारतात आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने मुंबईतील दाऊदचे नेटवर्क उद्ध्वस्त करु शकतो. राजनपासून फारकत घेतलेला शेट्टी दाऊदच्या संपर्कात आहे. शकीलने राजनचा गेम करण्याचा ‘विडा’ उचललेला असताना शेट्टीने त्याच्यासोबत हातमिळवणी केली आहे. मुंबईतील टोळ्यांशी संधान साधणे शेट्टीने सुरु केले आहे.
गँगस्टर संतोष शेट्टी गँगवाढीसाठी सक्रिय
By admin | Published: November 06, 2015 1:56 AM