कुख्यात गुंड सुमित येरुणकरची चुनाभट्टीत टाेळीयुद्धात हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:04 AM2023-12-25T06:04:02+5:302023-12-25T06:04:32+5:30
या हल्ल्यात आठ वर्षांच्या एका मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): महिनाभरापूर्वी पॅरोलवर बाहेर आलेला गुंड सुमित उर्फ पप्पू येरुणकर (४६) याची चुनाभट्टीत दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. येरुणकर पासून वेगळ्या झालेल्या सनी पाटील आणि सागर यांनी बांधकामाच्या कंत्राटासाठी त्याची हत्या केली. या हल्ल्यात आठ वर्षांच्या एका मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सागर सावंत, सनी पाटील यांना कंत्राट दिल्यामुळे सुमितने आर्यन बिल्डरवर गोळीबार केला होता. महिनाभरापूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला. हेच कंत्राट मिळवण्यासाठी रविवारी सुमित विकासकाच्या कार्यालयात गेला. ते समजताच कार्यालयाबाहेरच दबा धरून बसलेल्या नरेशने सुमितवर गोळीबार केला.
९ पथके तपासासाठी
याप्रकरणी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात हत्येसह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन तपासासाठी नऊ पथके स्थापन करण्यात आली आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले.
गाेळीबारात पाच जखमी
चुनाभट्टी येथील गजबजलेल्या आझाद गल्ली परिसरात दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी येरुणकरच्या दिशेने १६ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबारात पोटाला आणि खांद्याला दोन गोळ्या लागून येरुणकर गंभीर जखमी झाला. रोशन लोखंडे (३०) याच्या उजव्या मांडीला, मदन पाटील (५४) यांच्या डाव्या काखेत, आकाश खंडागळे (३१) याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि आठ वर्षांच्या त्रिशा शर्मा हिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे.