Join us

गावकीसमोर राजकीय पक्ष झुकले!

By admin | Published: April 08, 2015 12:32 AM

निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत असली तरी गावकीच्या एकीपुढे हे राजकीय पक्ष झुकले आहे.

अंबरनाथ : निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत असली तरी गावकीच्या एकीपुढे हे राजकीय पक्ष झुकले आहे. कोहजगांव या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांपैकी भाजपा उमेदवाराने गावकीचा निर्णय मानत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर याच गावाला लागून असलेल्या कमलाकर नगर प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली. या माघारीमुळे कोहजगांव प्रभागातून उमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अंबरनाथ पालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ कोहजगांव मध्ये काँग्रेसने उमेश अनंता पाटील यांना तर भाजपाने रोहन कृष्णा रसाळ यांना उमेदवारी दिली होती. याच प्रभागाला लागून प्रभाग क्रमांक ३ कमलाकर नगर या प्रभागातून काँग्रेसने प्रियंका कृष्णा पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने करुणा कृष्णा रसाळ यांना उमेदवारी दिली. दोन्ही प्रभागातील उमेदवार हे कोहजगावातील असल्याने तेथील ज्येष्ठांनी एकत्रित बैठक घेऊन एक जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपाला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपाचे रोहन रसाळ यांनी उमेदवारी मागे घेतली. तर प्रभाग क्रमांक ३ मधून काँग्रेसच्या प्रियंका पाटील यांची उमेदवारी मागे घेतली.