मुंबई : कोरोनाशी दोन हात करतानाच आता मुंबईसह महाराष्ट्रात उत्सवांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव तर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासह गणेश मूर्तीची उंची कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देखील उत्तम मिळत असतानाच आता कुर्ला येथील मूर्तीकार राहुल राजेंद्र घोणे यांनी घडलेली गणपती बाप्पाची मूर्ती येत्या दोन दिवसांत थेट अमेरिकेतील वॉशिंग्टन डिसी येथे रवाना होणार आहे.
मुंबई येथे वास्तव्य करणारे अनिल मोघे आणि लीला मोघे यांचे सुपुत्र चैतन्य मोघे हे कामानिमित्त अमेरिकेतील वॉशिंग्टन डिसी येथे वास्तव्यास आहेत. चैतन्य यांच्या घरी राहुल यांनी साकारलेली मूर्ती विराजमान होणार आहे. मूर्तीचे पॅकिंग पुर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत ही मूर्ती विमानाने रवाना होईल. वॉशिंग्टनला किरकलँड येथे गणेशमूर्ती जाणार आहे. चैतन्य हे राहुल यांचे मित्र आहेत. चैतन्य आणि राहुल या दोघांचे बाबा सुद्धा एकमेकांचे मित्र आहेत. गेल्या १५ वर्षांपासून चैतन्य अमेरिकेत आहे. गेल्यावर्षी चैतन्य यांनी राहुल यांच्या साकारलेल्या मूर्ती पाहिल्या. आणि त्यानंतर राहुलकडून श्रीगणेशाची मूर्ती घेण्याचे चैतन्य यांनी ठरविले. त्यानुसार, यावर्षी पहिली मूर्ती अमेरिकेला रवाना होत आहे.
राहुल राजेंद्र घोणे यांची दुसरी पिढी गणेश मूर्ती साकारत आहे. त्यांचे वडील पूर्वीपासूनच गणेशमूर्ती साकारत असून, यास ३२ वर्षे झाली आहेत. आता राहुल हे स्वत: आणि त्याची पत्नी मित्तल हे काम वडीलांसोबत करत असून, मित्तल या ऑनलाईन ऑर्डर घेण्याचे काम पाहत आहे. दरवर्षी मॉरिशिअसला राहुल यांच्या दोन मूर्ती रवाना होतात. एक मूर्ती दहा फुट आणि दुसरी मूर्ती सहा फुट आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे मूर्ती लहान करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आता यावर्षीचे नियोजन रद्द झाले आहे. राहुल यांच्या कार्यशाळेत चारशे प्रकाराच्या मूर्ती आहेत. काही येथे साकारल्या जातात. काही बाहेरून आणल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे ५० टक्के ऑर्डरच झाल्या आहेत, असे राहुल घोणे यांनी सांगितले.