Join us  

गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 2:07 AM

घरगुती गणपतीपासून ते अगदी मोठ्या गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने मोदकांचा नैवेद्य चढवितात.

मुंबई : गणेशोत्सव म्हटला की गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य हा असतोच. घरगुती गणपतीपासून ते अगदी मोठ्या गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने मोदकांचा नैवेद्य चढवितात.मात्र यंदा मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांना ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी दोन ते तीन दिवस आधीच मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडते़ यंदा मिठाईच्या दुकानांवर शुकशुकाट दिसून येत आहे.गणेशोत्सवासाठी मोदक दुकानामध्ये तयार आहेत, मात्र दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच मोदकांची विक्री झाली आहे. तरीही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोदकांची विक्री होईल अशी आम्हाला आशा आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत, असे दादर येथील डी दामोदर मिठाईवाला दुकानाचे मालक आदित्य आचार्य यांनी सांगितले. यंदा मोठ्या मंडळांनी आपले गणेशोत्सव रद्द केले आहेत. तर काही अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करत आहेत. लोक बाप्पाच्या दर्शनाला एकमेकांच्या घरीही जाणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोदकांची विक्री अत्यंत कमी झाली आहे.मात्र यंदा ग्राहकच नसल्याने अत्यंत कमी मोदक दुकानात ठेवले आहेत. गणेशोत्सव जवळ आला की आठवडाभर आधीच दुकान गर्दीने फुलून जाते. यासाठी चार ते पाच अतिरिक्त कामगार गणेशोत्सव कालावधीसाठी दुकानावर ठेवावे लागतात.मात्र यंदा दुकानावर गर्दी नाही. तरीही गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये दुकानात मोदकांची खरेदी झालीच तर तो आमच्यासाठी जॅकपॉट असेल. असे चेंबूर येथील सतूज स्वीट्स दुकानाचे मालक रितेश जगवानी यांनी सांगितले.

टॅग्स :गणेशोत्सव