गणपती सजावट साहित्याने मार्केट सजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:35 AM2019-08-26T00:35:30+5:302019-08-26T00:36:09+5:30
मंदिरांच्या प्रतिकृतीला पसंती : विविध पर्यावरणपूरक मखरे बाजारात उपलब्ध
मुंबई : गणेशोत्सव हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून सजावटीच्या साहित्यांनी मुंबई शहर व उपनगरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या वर्षी प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी लागू केल्यानंतर पर्यावरणपूरक मखरांना ग्राहकांनी पसंती दिली. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा मखरांनी बाजारपेठ भरून गेली आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती, निळकंठेश्वर, कार्तिक मयूर, सुखकर्ता दु:खहर्ता, श्रीकृष्ण, गं गणपती, ब्रह्मांडनायक, हत्तीदंत, नंदी आणि पैठणी इत्यादी पर्यावरणपूरक मखरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मखरांच्या बेसला प्लायवूड आणि लाकडी पट्ट्यांचा वापर करून ज्यूटचे वेस्टन लावले जाते. मखराच्या मागील भागात ज्यूट, मांजरपाट कपडा, जाडा हॅण्डक्राफ्ट पेपर, सनबोर्ड इत्यादी वस्तूंचा वापर करून मखरे तयार केली जातात. सर्व मखरे फोल्डिंगची आहेत. पर्यावरणपूरक मखरांची किंमत साधारण ८ हजार रुपयांपासून सुरू आहे. मखरांमध्ये पाण्याच्या रंगांचा वापर केला जातो. रंगावरती लॅकरचे कोटिंग केले जाते. लॅकरच्या कोटिंगमुळे रंग इतरत्र पसरत नाहीत, अशी माहिती अक्षय डेकोरेटर्सच्या अरुण दरेकर यांनी दिली.
चारकोप येथील श्री एकवीरा विद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे शाळेतील विद्यार्थी जवळपास १०० इकोफ्रेन्डली मखर तयार करून त्याचे प्रदर्शन मांडतात.
चायना लायटिंगला सर्वाधिक मागणी
चायना लायटिंग स्वस्तात मस्त असल्यामुळे या वस्तूंनी बाजारपेठा भरून गेल्या आहेत. चायना लायटिंगचे तोरण, दिवे, फोकस दिवे इत्यादी वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या वस्तूची किंमत ६० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत असल्यामुळे ग्राहकांना या सजावटीचे साहित्य परवडणारे आहे़ याला ग्राहकांची जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणपती टी-शर्टला मागणी
गणेशोत्सवात पारंपरिक वस्त्रे म्हणून परिधान करणारे कुर्ते, सदरे यांच्यासह गणपतीचे छायाचित्र असलेल्या टी-शर्टलाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसते. झेंडे, गांधी टोपी आणि फेटे यांनाही मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
पारंपरिक उपरण्यांना पसंती
गणेशमूर्तींना अधिक लोभस करणाऱ्या पारंपरिक उपरण्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उपरणांच्या किमतीमध्ये गणेशमूर्तींच्या उंचीप्रमाणे फरक आहे. सोनेरी, चंदेरी आणि चमकदार लेसचा वापर करून कलाकारांनी उपरण्यांना अधिक आकर्षक बनवले आहे.