ओमकार गावंड।मुंबई : गणेशोत्सव आणि ढोल-ताशा पथक यांचे वर्षानुवर्षांचे जुने नाते आहे. मागील चार ते पाच वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकाची क्रेझ जास्तच वाढल्याने प्रत्येक शहरांमध्ये ढोल-ताशा पथक तयार झाली आहेत. आपल्या गणपतीचे पाटपूजन, आगमन किंवा विसर्जनाला ढोल-ताशा पथक पाहिजेच, असा प्रत्येक मंडळाचा व गणेशभक्तांचा हट्ट असतो. या ढोल-ताशा पथकांना मिळणाऱ्या बिदागीमुळे दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते.
मुंबईतील ढोल-ताशा पथकांमध्ये मुख्यत: तरुण मुलामुलींचा समावेश जास्त आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागातून येणाºया पथकांमध्ये शेतकरी बांधवांचा समावेश असतो. काही पथकांमध्ये २० ढोल एकत्र वाजवतात. तर काही पथकांमध्ये एका वेळी १०० ढोल एकत्र वाजवले जातात. जुलै महिना सुरू होताच दरवर्षी गणपतीचे पाटपूजन तसेच आगमन सोहळ्याचे वेध लागतात. या सोहळ्यांना ढोल-ताशा पथकांना आवर्जून बोलावले जाते. त्यामुळेच मुंबईत रस्त्याच्या कडेला अथवा उड्डाणपुलांखाली ढोल-ताशांच्या सरावाचे स्वर कानावर पडतात. काही गर्दीच्या कारणांमुळे गणेशोत्सव मंडळांनी उत्सवच रद्द केला आहे.दरवर्षी गणपतीच्या दोन महिने अगोदर जुलै महिन्यापासून दरवर्षी ठरलेल्या सुपाºया मिळण्यास सुरुवात व्हायची. यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-ताशांवर हात घुमवायला मिळणार की नाही? याची चिंता पथकाकांना लागून राहिली आहे.
दरवर्षी आम्ही गणपतीच्या दोन महिने अगोदर ढोल-ताशाच्या सरावाला सुरुवात करायचो. जुलै महिन्यापासून दरवर्षी ठरलेल्या सुपाºया मिळण्यास सुरुवात व्हायची. परंतु यंदा सरकारने घातलेले निर्बंध तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या कारणांमुळे सराव बंद आहे. यंदा शेवटच्या क्षणापर्यंत जरी कोणत्या मंडळाकडून सुपारी मिळाली तरीही तेथे वादनासाठी जावे की नाही, हा प्रश्न अजूनही पडलेला आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही काही मित्रांनी एकत्र येत या पथकाची स्थापना केली होती. तेव्हापासून पथकातून मिळणाºया पैशांमधून विविध समाजोपयोगी कामे केली. लॉकडाऊन काळातही पथकातील अनेकांनी जनजागृतीपर कामे सुरू ठेवली आहेत.- अनिकेत हजारे, शिवगजर ढोल-ताशा पथक, मालाड पूर्व
यंदाच्या गणेशोत्सवात शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत ढोल-ताशा वादन करण्याची आमची तयारी आहे. आमच्या पथकातील वादक सरावासाठीही सज्ज आहेत. मात्र अपुरी जागा व सोशल डिस्टन्सिंगचे कारण पाहता ते तूर्तास शक्य नाही. जुलै महिन्यापासून सुपाºया मिळण्यास सुरुवात व्हायची. काही मंडळे बुकिंगसाठी आगाऊ रक्कमही द्यायचे. मात्र यंदा ढोल-ताशा पथकांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. तरीही गणेशोत्सवापर्यंत आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत.- चंदू तळे, जय मल्हार ढोल-ताशा पथक, चेंबूर