मुंबई - लाखो गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेला राजा, अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात महिलांना का डावललं जातंय?, असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी मंडळाच्या पुरुषप्रधानतेवर बोट ठेवलं आहे. आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम महिला काम करताहेत. पण, लालबाग राजाच्या भोवती एकही महिला कार्यकर्ती पाहायला मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. या उपेक्षेच्या निषेधार्थ वेंगुर्लेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी धर्मादाय आयुक्तालयाबाहेर उपोषण देखील केलं होतं. परंतु, कोणत्याही महिलेने कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेला नसल्याची भूमिका लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडली.
सामाजिक कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी गेली ८५ वर्ष पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या लालबागचा राजा मंडळात स्त्रियांना केवळ स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता बनवून कार्यकारिणीतून मात्र डावलले जाते. २०१० साली मंडळाने केवळ पुरुष वर्गणीदारच कार्यकारिणीत समाविष्ठ होण्याकरिता अर्ज करू शकतो असा प्रस्ताव काढला होता असं सांगितलं. याबाबत मंडळाचे अध्यक्ष कांबळे यांनी विचारले असता त्यांनी आमचं मंडळ महिलांचं अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक देत असून अद्याप कोणत्याही महिलेचा कार्यकारिणीत सामील होण्यासाठी विचारणाही झाली नाही की अर्ज देखील आलेला नाही. जाहीर सभेत आम्ही सर्व गोष्टींचा निर्णय घेतो. आजवर आमच्या मंडळात ८०० हून अधिक महिला सभासद आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.