दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन
By मनोहर कुंभेजकर | Published: September 18, 2024 08:09 AM2024-09-18T08:09:12+5:302024-09-18T08:09:45+5:30
विशेष म्हणजे बाप्पाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढली. तसेच येथील महिलांनी पंढरपूर वारी नृत्य सादर केले.
मुंबई - फिल्मसिटी जवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराला लागून असलेल्या दिंडोशी येथील न्यू म्हाडा श्री समर्थ फेडेरेशन बिल्डिंग नं २/३ या गृहनिर्माण सोसायटीने पर्यावरणाचा संदेश देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने येथील बाप्पाचे विसर्जन केले.
सोसायटीच्या उद्यानात कृत्रिम तलाव करून येथील सार्वजनिक गणेश मूर्तीचे रात्री उशिरा वाजतगाजत विसर्जन केले. विशेष म्हणजे बाप्पाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढली. तसेच येथील महिलांनी पंढरपूर वारी नृत्य सादर केले. या वर्षी येथील महिलांनी महिला अत्याचारावर पथनाट्य सादर केले अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनिलं थळे यांनी दिली. ते स्वतः चित्रपट क्षेत्रात कला दिग्दर्शक असून त्यांच्या संकल्पनेतून येथील सर्व कार्यक्रमाचे नियोजन होते.
दरम्यान या सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव २००६ पासून साजरा केला जातो आणि येथील रहिवाशी प्रत्येक वर्षी गणपती विसर्जनातून समाजाला संदेश देणारे जनजागृती कार्यक्रम राबवतं अशी माहिती थळे यांनी दिली.