Ganpati Special Mumbai Local: बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीच्या वेळी गणपती विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:01 AM2019-09-07T06:01:54+5:302019-09-07T06:01:59+5:30
Ganpati Special Mumbai Trains : रेल्वेच्या २८ विशेष लोकल; मध्य रेल्वे मार्गावरून तब्बल १२ फेऱ्यांची सुविधा, बेस्ट प्रशासनाकडूनही बसची सोय
मुंबई : मुंबईतील मोठ्या मंडळांच्या बाप्पाचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने रात्रकालीन २८ विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार ७ सप्टेंबरला आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी गुरुवार १२ सप्टेंबरला मध्य रेल्वे मार्गावरून रात्रकालीन १२, हार्बर रेल्वे मार्गावरून ८ आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून ८ लोकल चालविण्यात येतील. या सर्व लोकल धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. त्यामुळे सर्व स्थानकांवर थांबतील.
शनिवार ७ सप्टेंबर आणि गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी कल्याण स्थानकातून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांची सीएसएमटी लोकल चालविण्यात येईल. ती सीएसएमटीला रात्री १ वाजून २२ मिनिटांनी पोहोचेल. शनिवार आणि गुरुवारी विसर्जनावेळी सीएसएमटी ते कल्याण रात्री १ वाजून ३५ मिनिटांची, सीएसएमटी ते ठाणे रात्री २ वाजून ३० मिनिटांची, सीएसएमटी ते कल्याण रात्री ३.३०ची लोकल चालविण्यात येईल. ठाणे ते सीएसएमटी लोकल रात्री १ वाजता सुटेल.
हार्बर मार्गावरून शनिवार ७ आणि १२ सप्टेंबर रोजी सीएसएमटी ते पनवेल रात्री १ वाजून ३० मिनिटांची आणि रात्री २ वाजून ४५ मिनिटांची चालविण्यात येईल. पनवेल ते सीएसएमटी रात्री १ आणि रात्री १ वाजून ४५ मिनिटांची लोकल चालविण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरून ७, १२ सप्टेंबरला रात्री १ वाजून १५ मिनिटांची, रात्री १ वाजून ५५ मिनिटांची, रात्री २ वाजून २५ मिनिटांची, रात्री ३ वाजून २० मिनिटांची लोकल चालविण्यात येईल. तर विरारहून रात्री १२.१५ मिनिटांची, रात्री १२ वाजून ४५ मिनिटांची, रात्री १ वाजून ४० मिनिटांची आणि चौथी लोकल पहाटे ३ वाजता धावेल.
कसारा, कर्जत, खोपोलीतील प्रवाशांकडे दुर्लक्ष
मध्य रेल्वे प्रशासनाकडून कल्याण ते कसारा, कर्जत, खोपोली प्रवाशांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. गणपती विशेष लोकल कल्याण स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. परिणामी कसारा, कर्जत, खोपोली या स्थानकांदरम्यान राहणाऱ्यांना त्याचा फायदा नाही, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
गणेशभक्तांसाठी १८ जादा बस
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या वतीने ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत १८ जादा बस चालविण्यात येतील. रात्री ११ वाजून १५ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस धावतील. बसमार्ग क्रमांक ७ - बॅकबे आगार ते विक्रोळी आगार, बसमार्ग क्रमांक २१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते देवनार आगार, बसमार्ग क्रमांक २२ - इलेक्ट्रिक हाउस ते मरोळ-मरोशी बसस्थानक, बसमार्ग क्रमांक ४२ - पं. पलुस्कर चौक ते सँडहर्स्ट रोड स्थानक, बसमार्ग क्रमांक ४४ - वरळीगाव ते श्रावण यशवंते चौक (काळाचौकी), बसमार्ग क्रमांक ५१ - इलेक्ट्रिक हाउस ते वांद्रे आगार, बसमार्ग क्रमांक ६६ - खोदादाद सर्कल ते संत जगनाडे चौक, बसमार्ग क्रमांक ६९ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) या मार्गावर जादा बस चालविण्यात येतील.