गणपतीला विमानाने गावी जायचे स्वप्न यंदाही अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:28 AM2021-09-05T09:28:00+5:302021-09-05T09:29:18+5:30

‘चिपी’चे उद्घाटन ७ ऑक्टोबरला; मुख्यमंत्र्यांसह ज्योतिरादित्य शिंदेंना निमंत्रण

Ganpati's dream of going to the village by plane is still unfulfilled | गणपतीला विमानाने गावी जायचे स्वप्न यंदाही अपूर्णच

गणपतीला विमानाने गावी जायचे स्वप्न यंदाही अपूर्णच

Next
ठळक मुद्देयासंदर्भात  खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना उद्घाटनाचे निमंत्रण दिले. चिपी विमानतळ आता विमान प्रचलनासाठी सज्ज झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणपतीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण राहणार आहे. बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा लांबली असून, ७ ऑक्टोबरला येथून विमान उड्डाण सुरू करण्याचे नियोजन आहे.

यासंदर्भात  खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना उद्घाटनाचे निमंत्रण दिले. चिपी विमानतळ आता विमान प्रचलनासाठी सज्ज झाले आहे. अलायन्स एअर कंपनीने ७ ऑक्टोबरपासून येथून नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुभारंभाच्या दिवशी उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती राऊत यांनी केली आहे. ७ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तारीख पे तारीख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यासाठी कार्यक्रम पत्रिकाही छापल्या. परंतु, ऐनवेळी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
पुढे १ मार्चला उद्घाटनाची तारीख ठरली. मात्र, डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने हा मुहूर्तही हुकला. धावपट्टीचे काम पूर्ण केल्यानंतर आयआरबी कंपनीने २८ जून रोजी परवान्यासाठी अर्ज केला.
त्यावेळी गणेश चतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरून वाहतूक सुरू होणार असल्याचे विनायक राऊत यांनी जाहीर करून टाकले. परंतु, डीजीसीएचे पथक पुन्हा पाहणीसाठी न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.
त्यामुळे त्यांनी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेत सहकार्य करण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
अलीकडेच डीजीसीएच्या पथकाने पुन्हा पाहणी करीत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली. त्यामुळे ७ ऑक्टोबरपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करीत विमान उड्डाण सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Ganpati's dream of going to the village by plane is still unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.