Ganpatrao Deshmukh : राजकारणातील साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री अन् फडणवीसांकडून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:47 PM2021-07-30T23:47:31+5:302021-07-30T23:48:59+5:30
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच,
मुंबई - राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.