कचराकोंडी सुटणार
By admin | Published: April 30, 2017 04:45 AM2017-04-30T04:45:36+5:302017-04-30T04:45:36+5:30
मुंबईतील कचऱ्याचा भार पेलणाऱ्या कचराभूमीची क्षमता संपल्यामुळे गेली काही वर्षे कचरा प्रश्न पेटला आहे. मात्र तळोजा येथील कचराभूमी मुंबईला मिळण्याचा
मुंबई : मुंबईतील कचऱ्याचा भार पेलणाऱ्या कचराभूमीची क्षमता संपल्यामुळे गेली काही वर्षे कचरा प्रश्न पेटला आहे. मात्र तळोजा येथील कचराभूमी मुंबईला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाने नुकतेच यासाठी दहा कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे मुंबईला पडलेले कचऱ्याचे कोडे आता सुटणार आहे.
मुलुंड, देवनार या प्रमुख कचराभूमीची क्षमता संपली आहे. यापैकी मुलुंड कचराभूमीला टाळे लागले, तर देवनारमध्ये कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. या कचऱ्याला सतत आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे देवनारच नव्हे तर पूर्व उपनगरात कचराभूमीला विरोध सुरू आहे. कांजूरमार्ग येथे मिळालेली कचराभूमी वादात सापडली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्याने मुंबईत कचरा प्रश्न पेटला आहे.
यावर तोडगा म्हणून कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. अद्याप त्यास अपेक्षित यश मिळालेले नाही. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचेही प्रयत्न सुरू आहेत. परंतु मुंबईत दररोज तयार होणारा कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर तळोजा येथील जमीन मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र येथेही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला होता. अखेर ५० हेक्टरची ही जमीन मिळवण्यासाठी महापालिकेला यश आले आहे. (प्रतिनिधी)
तळोजा येथे ५० हेक्टर जमीन असून येथील ३८.८७ हेक्टर जागा राज्य सरकारची आहे. तर उर्वरित १२.२० हेक्टर जागा खासगी मालकाची आहे. या जमिनीसाठी महापालिकेने राज्य सरकारला दहा कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ही जमीन लवकरच महापालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी जमिनीवर असलेल्या नागरिकांना मात्र नुकसानभरपाई देऊन त्यांच्याकडून जमीन खाली करून घ्यावी लागणार आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंड : २३० मीटर लांबीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे़ या रस्त्याचा १० वर्षांचा हमी कालावधी आहे. सध्या या डम्पिंग ग्राउंडच्या रस्त्यांची दुरवस्था असल्याने वाहने हळू चालवावी लागतात़ त्याचा परिणाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांवर होत असल्याने तातडीने कामाची गरज आहे़ रस्ता खचणार नाही, याची काळजी घेणे, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवरील चालकांना रात्रीच्या वेळी येथे वाहने चालविणे शक्य होण्यासाठी दिवाबत्ती किंवा हायमास्टचे दिवे लावण्यात येणार आहेत.
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड : काँक्रिटचा रस्ता करण्यासाठी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करून रस्त्याची दुसरी बाजू वाहनांसाठी खुली ठेवण्यात येईल़ रस्त्याच्या बंद करण्यात आलेल्या बाजूचे काँक्रिटचे काम २० दिवसांच्या अंतराने सिमेंटचे स्लॅब टाकून करण्यात येईल़ कांजूरला डांबरी रस्ता बांधण्यात येणार आहे़ या डम्पिंग ग्राउंडचा रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते क्षेपणभूमीपर्यंतच्या प्रवेशद्वारापर्यंत अंदाजे अडीचशे मीटर लांबीचा बनविण्यात येणार आहे़ त्याचा हमी कालावधी दोन वर्षे आहे़ एमएमआरडीएकडे असलेल्या या रस्त्याचा ताबा आता महापालिकेकडे आहे़
ओला-सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे
- मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू असून देवनारचीही क्षमता संपली आहे. त्यामुळे पालिकेला कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी पर्याय शोधणे भाग आहे.
- ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र मुंबईत आजही अनेक ठिकाणी ओला व सुका कचरा नागरिक वेगळा ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना दोन स्वतंत्र डबे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला.