कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ठेवली जाणार नजर
By जयंत होवाळ | Published: April 19, 2024 10:52 PM2024-04-19T22:52:14+5:302024-04-19T22:52:30+5:30
या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून निवडणुकीनंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
मुंबई : कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर 'व्हेईकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट' यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनांवर ही यंत्रणा यापूर्वीच बसवण्यात अली आहे. मात्र पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर अशी यंत्रणा नाही. आता याही वाहनांवर यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे या वाहनांची सद्यस्थिती समजणे सोपे जाईल. कचरा वाहून नेणाऱ्या संबंधित वाहनचालकांवर देण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडली जात आहे का, दिवसभरात कोणत्या वेळी कचरा उचलला जातॊ, किती वेळा कचरा उचलला जातो , कचऱ्याची विल्हेवाट निश्चित ठिकाणी केली जात आहे कि नाही, यावर या यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे;. या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून निवडणुकीनंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
सध्या पालिकेकडे स्वमालकीची १३०० आणि भाडे तत्वावरील १५०० वाहने आहेत. यापैकी पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर यंत्रणा नाही. कचरा वाहून नेणारे डम्पर, स्वीपिंग मशीन , बीच क्लिनिंग मशीन आदी वाहनांचा ताफा पालिकेकडे आहे. व्हेईकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट यंत्रणेचे नियंत्रण करण्यासाठी पालिका ग्रँट रोड येथे केंद्र उभारणार आहे.भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या वाहनांवर बसवण्यात आलेली यंत्रणाही भाडेतत्वावरील आहे. पालिकेकडे स्वतःच्या मालकीची यंत्रणा नाही. त्यामुळे स्वतःच्या मालकीच्या वाहनांवरही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने अलीकडच्या काळात स्वच्छ मुंबई मोहिमेवर भर दिला आहे. रस्ते धुण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी एकच कंत्राटदार नेमला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. मात्र अजून कंत्राटदार मिळालेला नाही.