Join us

मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 7:06 AM

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शुभारंभ : एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात आठव़ड्यातील दोन दिवस स्वच्छता मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीएने गेटवे ऑफ इंडिया येथे मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे जलतलावावरच्या कचऱ्याचे संकलन करण्याचा शुभारंभ केला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला.  आठवड्यातील दोन दिवस परिसरातील समुद्रातील तरंगत्या कचऱ्याचे संकलन करणार येणार असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.

किनारपट्टी भागांचीही स्वच्छतादेशाच्या सागरी अर्थव्यवस्थेचे रक्षक म्हणून समुद्रे आणि परिसंस्था संरक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे. याचा भाग म्हणून जेएनपीएने एक मानवरहित सौर ऊर्जा बोट सुरू केली आहे. ही बोट आठवड्यातून दोनदा गेट वे ऑफ इंडिया येथे कचरा संकलित करणार आहे, तसेच ही बोट एलिफंटा सागरातही स्वच्छता मोहीम राबवणार आहे.  जेएनपीएमध्येही कार्यरत राहून किनारपट्टी भागांची स्वच्छताही ही बोट राखणार आहे.

ही आहेत बोटीची प्रमुख वैशिष्ट्ये जेएनपीएने स्मार्ट आणि सागरी उपाय पुरवणाऱ्या क्लिअरबॉट टीमसोबत करार केला आहे. या मानवरहित सौर ऊर्जा बोटमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. ही बोट स्वयंचलितपणे कार्य करते. लीडार सेन्सर्स आणि पेटंटेड अव्हॉइडन्स तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंना शोधून त्यांचा मागोवा घेते.  विविध सागरी वातावरणात कार्यक्षम आणि सुरक्षित कचरा संकलन करते.  याशिवाय, या बोटीच्या सहाय्याने सातत्यपूर्ण डेटाचे संकलन करून डॅशबोर्डवर रिअल-टाइममध्ये प्रदर्शित होते. ज्यामुळे देखरेख आणि विश्लेषण सुलभ होते. या बोटीची टिकाऊपणा वाढवण्यासाठी तिच्यात सौर पॅनल्स बसविले आहेत. बोटीत ऑटो-डॉकिंग क्षमता असून ती सहजपणे डॉकिंग स्टेशनवर परतू शकते. ५०० किलोग्रॅम पर्यंतच्या वजनाचे सहज हाताळते.