कचरावेचक आजी नातवंडांच्या शिक्षणासाठी धडपडतेय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:24 PM2022-03-09T17:24:44+5:302022-03-09T17:25:19+5:30
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ विदयामंदिरच्या बालरक्षक म्हणून काम करणाऱ्या कल्पना शेंडे यांच्या मदतीने महेश व गणेश या २ भावंडांचा प्रवेश शिक्षणाच्या प्रवाहात झाला आहे.
मुंबई - वय वर्षे ७० मात्र आजही सकाळी ७ वाजता शांताबाई पाथरकर कचरा वेचायला जातात आणि थेट दुपारी येतात. कचरा वाचून येताना जवळ असलेल्या मंदिरात भिक्षेत मिळालेले अन्न नातवंडांना खाऊ घालतात आणि जे काही १०० - १५० रुपये कचऱ्यातून मिळतात ते नातवंडांच्या शिक्षणासाठी जपून ठेवतात. आई वडील नसलेल्या आपल्या नातवंडांना कचऱ्याच्या जगातून बाहेर काढून चांगले शिक्षण देण्याचे शांताबाईंचे स्वप्न असून चेंबूरच्या टिळक नगर येथील महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ विदयामंदिर शाळेकडून त्यांच्या स्वप्नाला हातभार लागत आहे. शाळेकडून शांताबाईंच्या २ नातवंडांना मोफत प्रवेश तर देण्यात आला आहेच मात्र त्यांना हवे - नको त्या आवश्यक गोष्टींची पूर्तता ही शाळेकडून केली जाते.
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ विदयामंदिरच्या बालरक्षक म्हणून काम करणाऱ्या कल्पना शेंडे यांच्या मदतीने महेश व गणेश या २ भावंडांचा प्रवेश शिक्षणाच्या प्रवाहात झाला आहे. आपल्या नातवंडांना चांगले शिक्षण मिळावे त्यासाठी त्यांची आजी धडपडत असल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना शेंडे अनेक कचरावेचक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू पाहत असून त्यांना त्यांच्या शाळेची आणि मुख्याध्यापक, विश्वस्तांची मोलाची साथ मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. या २ भावंडाना केवळ शाळेचे उपयोगी साहित्यच नाही तर पोषण आहारही दिला जातो. ही दोन्ही भावंडे अभ्यासू असून एकाने खूप शिकून इंजिनिअर होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. कोरोनाकाळात कचरावेचक समाजातील अनेक मुले शिक्षणातून बाहेर पडली आहेत, त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, त्यासाठी धोरण खायला हवे अशी प्रतिक्रिया कल्पना शेंडे यांनी दिली.