Join us

बिनधास्त जाळा मुंबईत उघड्यावर कचरा, दंड मात्र होणार, फक्त 100 रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 1:30 PM

१७ वर्षांनंतरही महापालिकेच्या दंडाची रक्कम ‘जैसे थे’च

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हवेची सातत्याने घसरत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारू पाहणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दंडाच्या रकमेत गेल्या १७ वर्षांत तसूभरही बदल झालेला नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. उघड्यावर  कचरा जाळल्यास अवघे १०० रुपये भरून सुटका करून घेता येते. त्यामुळे कचरा जाळून प्रदूषण वाढविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी हे पुरेसे नसून दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी, २००६ नुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या वा स्वच्छतेचे नियम धुडकावणाऱ्यांसाठी पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे. या ठरवून दिलेल्या नियमांनुसारच मुंबईत दंडाची वसुली होत आहे. यात उघड्यावर कचरा जाळणे, स्नान, लघवी, मलविसर्जन करणे यासाठी अवघे १०० ते २०० रुपये दंड ठरवून देण्यात आला आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने नुकत्याच आणलेल्या नियमावलीत उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे.

जरब बसण्यासाठी दंडवाढ हवी- दोन वर्षांपूर्वी महापालिकेने थुंकणाऱ्यांना वचक बसावा म्हणून त्यासाठीच्या दंडात २०० वरून १२०० रुपये इतकी वाढ प्रस्तावित आहे. पालिकेच्या या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी लोकांना जरब बसेल इतपत दंडात वाढ व्हायला हवी, अशी मागणी केली.

राडारोडा टाकणाऱ्यांकडून २०,०००- पालिकेने राडारोडा टाकणाऱ्यांवरही कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, अशा बांधकाम व्यावसायिकांकडून केवळ २० हजार रुपये दंडाची वसुली केली जाते.

कायदा काय सांगतो?

कचरा उघड्यावर जाळणे हा पर्यावरण कायदे आणि भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसारही गुन्हा आहे. स्थानिक प्रशासनाला यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एका प्रकरणात तर राष्ट्रीय हरित लवादाने उघड्यावर कचरा पेटविणाऱ्याला एक लाख रूपये दंड केला होता. प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. कचरा जाळण्याबरोबरच ज्याच्या आवारात जो जाळला गेला आहे, त्यालाही कायद्यानुसार जबाबदार ठरवता येते.

नियमावलीत उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली

  कचरा जाळताना कुणी आढळून आल्यास दंड किती तर तो अवघे १०० रुपये.   आज १०० रुपये भरून पालिकेच्या कारवाईतून कुणीही सहज सुटू शकतो, अशी खंत पश्चिम उपनगरातील पालिकेच्या सहायक अभियंत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. नुकत्याच आणलेल्या नियमावलीत उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे.

टॅग्स :कचरा प्रश्नमुंबई