Join us  

मुंबईतील आठ ठिकाणी नदी-नाल्यांमधून 'ट्रॅश बूम' द्वारे बाहेर काढला जातोय कचरा

By सचिन लुंगसे | Published: October 20, 2022 9:09 PM

डंपरच्या ७५० फेऱ्यांद्वारे हा कचरा वाहून नेत त्याची योग्यरितीने विल्हेवाट देखील लावली आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांमध्ये ट्रॅशबूमचा हा प्रयोग अतिशय मोलाचा ठरणार असून भविष्यात इतरही ठिकाणी ही उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

मुंबई : मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी तो संकलित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना यश येवू लागले आहे. त्यासाठी परिणामकारक ठरत आहेत आठ ठिकाणी सरकत्या पट्ट्यांसह लावलेले ट्रॅशबूम. या आठ ठिकाणांवरील ट्रॅश बूमच्या सहाय्याने मागील तीन महिन्यांत तब्बल १० हजार ५०० क्यूबिक मीटर तरंगता कचरा अडवून संकलित करण्यात आला आहे. 

डंपरच्या ७५० फेऱ्यांद्वारे हा कचरा वाहून नेत त्याची योग्यरितीने विल्हेवाट देखील लावली आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांमध्ये ट्रॅशबूमचा हा प्रयोग अतिशय मोलाचा ठरणार असून भविष्यात इतरही ठिकाणी ही उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

मुंबई महानगरातील जलप्रदूषण रोखून अधिकाधिक पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुंबईलगतचा समुद्र किनारा स्वच्छ राखणे, जलप्रदूषण होवू नये, मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र प्‍लास्टिक मुक्‍त राखणे, प्‍लास्टिक आणि इतर तत्सम कचरा समुद्रामध्ये थेट वाहून न जाता त्यापूर्वीच तो संकलित करणे, त्‍याची योग्यरित्या विल्‍हेवाट लावणे यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची चाचपणी करण्यात येत आहे. विदेशांमध्ये ट्रॅशबूम किंवा ट्रॅशनेट या तंत्राचा उपयोग करुन अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अंमलबजावणी मुंबईतही करता यावी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार पर्जन्य जल खात्याने योग्य कार्यवाही करुन  मुंबईत एकूण आठ ठिकाणी ट्रॅशबूम व त्याला जोडून सरकते पट्टे असलेली यंत्रणा आता स्थापित केली आहे. त्यामुळे प्रवाहांमधील तरंगता कचरा अडवणे आणि अडवलेला कचरा बाहेर काढणे ही दोन्ही कामे अतिशय वेगाने व सुलभपणे होवू लागली आहेत.     सदरची यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आठ ठिकाणांमध्ये, पश्चिम उपनगरातील जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अव्‍हेन्‍यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला,  ओशिवरा नदी, पोइसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी तर पूर्व उपनगरातील मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकूल जोडपूल) येथे ट्रॅशबूम प्रणालीची स्‍थापना करण्यात आली आहे. संयंत्रांची उभारणी केल्यानंतर प्रारंभी चाचणी करण्यात आली. चाचणीअंती सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिनांक १५ जुलै २०२२ पासून या सर्व आठही ठिकाणची ही यंत्रणा नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.  तर नवव्या ठिकाणी म्हणजे मिठी नदीवर माहीम निसर्ग उद्यानाला लागून असलेल्या जागी येत्या आठवडाभरात ही यंत्रणा सुरु होणार आहे.

    ट्रॅशबूम कार्यान्वित झालेल्या आठ ठिकाणांवरुन आतापर्यंत तीन महिन्यांत एकूण १० हजार ५०० क्‍युबिक मीटर एवढा कचरा अडवून संकलित करण्यात आला आहे. सरकत्या पट्टयांद्वारे सुलभपणे हा कचरा बाहेर काढण्यात आला. तसेच डंपरच्‍या ७५० फेऱयांद्वारे हा कचरा वाहून नेवून त्‍याची विल्‍हेवाट देखील योग्यरितीने लावण्‍यात आली आहे.  

    नदी आणि नाल्यांमधील तरंगता कचरा थेट समुद्रात जाण्‍यापासून रोखणे व त्‍याचप्रमाणे नद्या व समुद्रामध्‍ये होणारे जलप्रदूषण रोखणे हा ट्रॅशबूम प्रकल्‍पाचा प्रमुख उद्देश आहे. या आठही ठिकाणांवरुन मिळून अडवून संकलित झालेल्या तरंगता कचऱयाचे प्रमाण लक्षात घेतले तर महानगरपालिकेने स्थापन केलेली ही यंत्रणा यशस्वी होत आहे, असे ठामपणे सांगता येते.

    महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) या खात्याने ही सर्व यंत्रणा स्थापन करण्याची कार्यवाही केली आहे. मुंबईतील विविध नऊ नदी / नाल्यांच्या ठिकाणी ट्रॅशबूमसह सरकता पट्टा (conveyor belt) लावून तरंगता कचरा अडवणे, तो संकलित करुन बाहेर काढणे यासाठी आवश्यक यंत्रणेचा पुरवठा, स्‍थापना, चाचणी व कार्यान्वित करणे, तसेच संकलित कचऱयाची विल्‍हेवाट लावणे, तसेच संपूर्ण यंत्रणेचे पुढील ३ वर्षांचे प्रचालन व परिरक्षण करणे अशा एकत्रित कामासाठी निविदा मागविण्‍यात आल्‍या होत्या. त्यानुसार ४५ कोटी २० लाख रुपये किमतीचे कंत्राट प्रदान करण्‍यात आले. यामध्ये ट्रॅशबूम प्रणालीच्‍या स्‍थापनेची किंमत एकूण १३ कोटी ४६ लाख रुपये आहे. तर पुढील ३ वर्षांकरीता या प्रणालीतून कचरा संकलित करणे, बाहेर काढणे, काढलेला कचरा वाहून नेणे, वाहून नेल्यानंतर त्‍याची योग्यरितीने विल्‍हेवाट लावणे, या संपूर्ण प्रचालन व परिरक्षण कामाचा एकूण खर्च ३१ कोटी ७३ लाख रुपये इतका आहे. सदर ट्रॅशबूम प्रणाली ही डेन्‍मार्कमधील त्याचे मूळ उत्‍पादक मेसर्स डेस्‍मी एन्‍व्‍हारो केअर यांचेकडून आयात करण्‍यात आली आहे. 

    महानगरपालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न आणि उपाययोजना तर करण्यात येत आहेतच. मात्र, या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा, तसेच महानगरातील नदी-नाले स्वच्छ राखण्यासाठी, एकूणच जलप्रदूषण रोखण्यासाठी कृपया नागरिकांनी प्‍लास्टिक तसेच तत्सम कोणत्‍याही प्रकारचा कचरा नदी, नाल्‍यांमध्‍ये टाकू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईकचरा प्रश्न