कुलदीप घायवट
मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर दिले आहेत. हे मास्क 'वन टाइम युज'चे आहेत. मास्क वापरल्यावर योग्यरित्या विल्हेवाट लावायची असते. मात्र याबाबत कर्मचारी अनभिज्ञ असल्याने मुंबई सेंट्रल आगारात मास्कचा कचरा दिसून येत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यक होते. मात्र जनजागृती होत नसल्याने कोरोनाचे सावट एसटी महामंडळावर पसरले आहे.
लॉकडाऊन काळात मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी धावत आहे. यासाठी एसटीचे कर्मचारी काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले आहेत. मात्र या मास्कचा वापर झाल्यानंतर काय करावे, याची माहिती एसटी महामंडळाकडून दिली जात नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांकडून मास्क इतरत्र फेकले जात आहेत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
एसटी लॉकडाऊन काळात सुरु राहावी म्हणून मुंबई सेंट्रल आगारात एकूण ७० ते ८० कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर झाल्यावर ते मास्क कुठेही फेकले जात आहेत. यासह कोरोना काळात कुठेही थुंकणे चुकीचे आहेत. परंतु, कर्मचारी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकत आहेत.
आगारात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मास्क आणि इतर कचरा वाढत आहे. मास्क जमिनीवर पडून राहिल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
-----------------------------------
लक्षणे विहरीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वानी खबरदारी घेतली पाहिजे. मास्क जमिनीवर पडून राहिल्यास त्या जागेवर संसर्ग वाढू शकतो. जैविक कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली गेली पाहिजे. कापडी मास्कचा वापर झाल्यावर गरम पाण्यात उकळून सुकविला पाहिजे. 'वन टाइम युज' मास्कला योग्य ठिकाणी योग्य काळजी घेऊन जाळणे पाहिजे.
- डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
-----------------------------------
आगारातील मास्क उचलून साफ करण्याचे काम सुरु आहे. हे मास्क जमा करून जाळले जातात. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क देताना मास्कचा वापर कसा करायचा, मास्कची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र मुंबई सेंट्रल आगारात राज्यभरातील आगारातील कर्मचारी आले आहेत, त्यांच्याकडून मास्कचा कचरा झाल्याची शक्यता आहे. मात्र कचरा झाल्यास तो त्वरित साफ केला जातो, अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.
-----------------------------------