Join us

करोडो रूपयांच्या भूखंडाची कचराकुंडी

By admin | Published: May 24, 2016 2:00 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मॅफ्कोकडून ११ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जवळपास पाच

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मॅफ्कोकडून ११ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जवळपास पाच वर्षांपासून या जागेचा काहीही उपयोग केलेला नसून त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल शाखेच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीची करोडो रूपयांची मालमत्ता धूळ खात पडून आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वास्तू व जागेचा योग्य वापर करण्यास अपयश आले आहे. बाजार समिती मुख्यालयाला लागून मॅफ्को महामंडळाकडील भूखंड ११ कोटी रूपयांना विकत घेतला आहे. हा भूखंड मिळविण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे, तत्कालीन सचिव सुधीर तुंगार व संचालक मंडळाने खूप परिश्रम घेतले होते. भूखंड ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ त्याला कुंपण घालण्यात आले होते. कांदा मार्केटची संरक्षण भिंत पाडून भूखंडाकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहाराही ठेवला. परंतु काही महिन्यामध्येच सुरक्षा रक्षकांना तेथून हलविण्यात आले. बाजार समितीने घातलेले तारेचे कुंपण चोरट्यांनी भंगारवाल्यांना विकले आहे. या परिसरातील कंपन्यांचे नूतनीकरण करताना निघालेले डेब्रिज या भूखंडाच्या काठावर टाकण्यास सुरवात झाली. भूखंडावरही मोठ्याप्रमाणात कचरा टाकला जात आहे. बाजार समिती प्रशासन या भूखंडाचा काहीही उपयोग करत नाही. वास्तविक या परिसरामधील कोल्डस्टोरेज चालकांनी कोल्डस्टोरेजच्या आवारामध्ये अतिक्रमण करून पॅकिंगसाठी शेड तयार केले असून ती भाडेकराराने देवून प्रचंड पैसे कमवत आहेत. परंतु बाजार समितीकडे मोकळा भूखंड असूनही त्याचा काहीही वापर केला जात नाही. पूर्वी याठिकाणी असणाऱ्या इमारतीमध्ये बँक व इतर व्यवसाय सुरू होते. परंतु बाजार समितीने ही जागा ताब्यात घेतल्यापासून या भूखंडाचे डंपिंग ग्राऊंड झाले आहे. येथील कचऱ्याचा बाजूच्या मॅफ्को मार्केटमधील विक्रेत्यांनाही त्रास होवू लागला असून बाजार समितीच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.