Join us

कचरा उचलला नाही, ढिगारे आहेत? मुंबईकर करू शकणार थेट चॅटबॉटवर तक्रार, उद्यापासून सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 12:54 PM

सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांबाबत केलेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदविता यावी यासाठी मुंबई पालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक दिला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या घनकचरा विषयक तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पाहणीदौऱ्या दरम्यान, मुंबईत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना थेट संपर्क सेवा देण्याचे निर्देश  दिले होते. आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार चॅटबॉट सुविधा नागरिकांना उपलब्ध केली आहे.

कचरा समस्यांत १२४ टक्क्यांनी वाढ 

घनकचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४ टक्क्यांनी वाढल्या असून २०२२ मध्ये पालिकेने सरासरी रोज ६,३८५ मेट्रिक टन २४ विभागातून जमा होतो. रोज अधिक कचरा ‘एल’ विभाग (प्रति दिन ४९१ मेट्रिक टन) जी/ उत्तर विभाग (प्रति दिन ४५९ मेट्रिक टन) आणि के पूर्व विभाग (प्रति दिन ४४१ मेट्रिक टन) या विभागांमधून कचरा जमा होतो.

कशी नोंदविता येणार तक्रार

पालिकेने दिलेल्या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे आदींबाबतच्या तक्रारी थेट छायाचित्रासह करता येणार. 

नागरिकांनी तक्रारीसोबत छायाचित्र, त्या ठिकाणाचा पत्ता/ जीपीएस लोकेशन पाठविणे आवश्यक आहे. या तक्रारीची व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणी झाल्यानंतर, ती संबंधित विभागाकडे थेट जाणार. 

सध्या तक्रार निर्मूलनासाठी लागणारा वेळ या सुविधेमुळे कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करून त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील आणि त्याद्वारे नागरिकांना तक्रारीचे निर्मूलन केल्याचे समजणार आहे.

 

टॅग्स :मुंबई