कोट्यवधींची वाहने खरेदी करूनही कचरा रस्त्यावरच; रोजचा खर्च दोन कोटींचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:36 AM2023-08-04T09:36:01+5:302023-08-04T09:36:48+5:30
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.
मुंबई :
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. कोट्यवधींची वाहने, शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरवून ही कचऱ्याची समस्या काही सुटलेली नाही. रोजचा दोन ते सव्वादोन कोटींचा खर्च केला जात आहे. शहरातील नागरिकांकडून रोज ५० च्या वर तक्रारी पालिकेकडे येत आहेत. शहरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने मुंबईकरांना मात्र दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यात कचऱ्यामुळे साथीचे रोग फैलावतात. प्रजा फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतला रोजचा ६,३०० मेट्रिक टन कचरा वाहून नेण्यासाठी पालिका २.२४ कोटी रुपये रोज खर्च करते आणि दरवर्षी अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूदही करते, पण तरी कचरा तक्रारींची संख्या वाढतच आहे. २०२२ मध्ये १२ हजार ३५१ तक्रारींची नोंद झाली आहे. ती २०१३ मध्ये ५ हजार ५१९ होती. हा खर्च आणि तक्रारी कमी करता येईल का यावर पालिका उपायोजना केव्हा करणार आणि तक्रारी कशा सोडविणार हे खरे प्रश्न आहेत.
अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी अधिकाऱ्यांना कचरा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कचरा उचलण्याच्या रोजच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने कोट्यवधी रुपयांची ३२ कॉम्पॅक्टर वाहने ताफ्यात दाखल झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे यांनी दिली. एकूण ३२ कॉम्पॅक्टर वाहनांपैकी शहरासाठी ६, पश्चिम उपनगरे ११ आणि पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. दरम्यान, मुंबईत आज ही दिवसाला सरासरी ५४ कचऱ्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत.
चॅटबॉटवरील तक्रारींचा निपटारा
पालिकेच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर जुलैच्या अखेरपर्यंत ५१६२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी घनकचरा विभागाशी संबंधित ५०२३ तक्रारी आल्या होत्या. तक्रारींपैकी ५०१८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे तर १३९ तक्रारी या कचऱ्याशी संबंधित नव्हत्या अशी माहिती पालिकेने दिली.
तक्रारी
सर्वाधिक: कचऱ्याच्या सर्वाधिक तक्रारी भांडुप, विक्रोळी, मालाड, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, माटुंगा भागातून
कमी: दक्षिण मुंबई परिसरातून कचऱ्याच्या सगळ्यात कमी तक्रारी
दैनंदिन कचरा, गाळ आणि राडारोडा गोळा करण्यासाठी वाहने
५,०२३: कचऱ्याशी संबंधित
५,१६२: ७ ते ३१ जुलै दरम्यानच्या तक्रारी
५: प्रलंबित तक्रारी
५,०१८: सोडविलेल्या तक्रारी
१,६९४: कंत्राटदाराची
२४६: पालिकेची
६,००० मेट्रिक टन कचरा कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे पाठविला जातो
८०० मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमी येथे पाठविण्यात येतो
मुंबईतील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम सेवा देण्याचा आमचा मानस आहे.
- चंदा जाधव, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
फक्त कॉम्पॅक्टर्सवर खर्च करण्यापेक्षा, कायमस्वरूपी मनुष्यबळावर ही पालिकेने खर्च केला तर या समस्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल. कंत्राटी मनुष्यबळ व वाहने यावर पालिका अवलंबून असल्याने कचऱ्याच्या तक्रारींचा पाढा रोखणे शक्य होत नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांनीही संबंधित विभागात जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते