Join us

वाहतुकीच्या नियमांचा ‘कचरा’

By admin | Published: November 04, 2014 12:42 AM

ठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवून उघड्या वाहनांमधून सर्रास कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. ज्यामुळे हवेतून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवून उघड्या वाहनांमधून सर्रास कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. ज्यामुळे हवेतून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर सुविधांअभावी या वाहनांवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात कचरा उचलणारी यंत्रणा कोलमडली आहे. ठेकेदाराच्या कामाची मुदत जवळपास दोन वर्षापूर्वीच संपली आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीच्या प्रस्तावावर आक्षेप घेतल्यामुळे सदर प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. शासनाकडून ठेकेदार नियुक्तीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रियेचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान घनकचरा विभागाने विभाग निहाय खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. वास्तविक कचरा वाहतूक कशी करावी यासाठी नियमावली आहे. बंद वाहनामधून कचऱ्याची वाहतूक होणे आवश्यक आहे. कचरा उचलण्याचे व वाहतुकीचे काम करणाऱ्या कामगारांना मोजे, बूट व मास्क देणे आवश्यक आहे. परंतु नवी मुंबईतील ठेकेदारांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शहरातील कचऱ्याची उघड्या डंपरमधून वाहतूक केली जात आहे. अनेक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरला जातो. हा कचरा अनेकवेळा रस्त्यावर पडत आहे. चुकीच्या पद्धतीने कचऱ्याची वाहतूक केल्यामुळे यापूर्वी नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु यानंतरही कचरा वाहतुकीच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नाही.कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कामगार कुठल्याही साहित्याअभावी उभे असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून घनकचरा विभागातील कामगारांची आरोग्य तपासणी करण्याची मागणीही केली जात आहे. तसेच या कामगारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे. कचरा वाहतूक नियमाप्रमाणे झाली नाही तर महापालिकेवर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याविषयी गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.